‘मुळा’तील रांजणखळगे पर्यटकांना करताहेत आकर्षित! निघोजनंतर पर्यटक व अभ्यासकांना मिळणार नवी ‘पर्वणी’

नायक वृत्तसेवा, घारगाव
अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडापासून उगम पावणार्‍या मुळा नदीने अवघे खोरे समृद्ध केले आहे. याचबरोबर सह्याद्रीतील पर्वतरांगा देखील संगमनेर तालुक्यातील पठारभागात पसरल्याने पठारभाग नेहमीच पर्यटकांना साद घालत आला आहे. सध्या मुळा नदी वाहती असून, घारगाव नजीक असणार्‍या बोरबन सराटी येथील नदीपात्रातील मोठमोठे रांजणखळगे हे पर्यटकांना चांगलेच आकर्षित करु लागले आहेत.

पारनेर तालुक्यातील निघोज येथील रांजणखळगे हे पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांनी नेहमीच पर्वणी ठरलेले आहेत. मात्र, उत्तर नगर जिल्ह्याला समृद्ध करणार्‍या मुळा नदीत देखील रांजणखळगे आहेत. निसर्ग सौंदर्य लाभलेल्या पठारभागातील घारगाव नजीक असणार्‍या बोरबन सराटी येथून तुडूंब भरुन वाहणार्‍या मुळा नदीपात्रात हे रांजणखळगे आहेत. सध्या नदीचा प्रवाह रोडावला असल्याने हे रांजणखळगे पर्यटकांना खुणावत आहेत. एरव्ही पावसाळ्यात नदीचा प्रवाह मोठा असल्याने ते लुप्त असतात. मात्र, प्रवाह संथ आणि कमी झाल्यास ते तत्काळ दृष्टीस पडतात.

पावसाळ्यात निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पठारभागात पर्यटकांची गर्दी असते. कळमजाई, जोठेवाडीतील वीरभद्र, खंद्रेश्वर, तामकडा आदी धबधब्यांच्या फेसाळणार्‍या पाण्यात मनसोक्त ओलेचिंब होणार्‍या पर्यटकांना मुळा नदीपात्रातील रांजणखळगे साद घालत आहेत. याचबरोबर निघोजनंतर अभ्यासकांनाही हे खळगे आकर्षित करत आहे. आता ही पर्यटनस्थळे व तीर्थस्थान विकसित करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार आहे.

पठारभागातील निसर्ग सौंदर्य कायमच पर्यटकांना भुरळ घालत आला आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्यासह परिसराचाही पर्यटनात्मक विकास होईल यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– अजय फटांगरे (काँग्रेस गटनेते-जिल्हा परिषद)

Visits: 137 Today: 1 Total: 1098710

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *