संगमनेरचा कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर वाजणार डंका! निमजच्या रुचिता मतकरची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याने देशाला व राज्याला अनेक क्षेत्रांत नामवंत व्यक्तिमत्त्व दिलेली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रात अनेकांनी संगमनेरचे नाव रोशन केलेले आहे. त्यात अधिक भर पडली असून, निमज येथील शेतकरी कुटुंबातील रुचिता वसंत मतकर हिची राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. झारखंड येथे ही स्पर्धा पार पडणार असून, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होणारी संगमनेर तालुक्यातील रुचिता ही पहिलीच महिला कुस्तीपट्टू ठरणार आहे.
संगमनेरपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील निमज या गावात शेतकरी कुटुंबात रुचिताचा जन्म झालेला आहे. रुचिताला कुस्ती खेळाची पहिल्यापासूनच आवड असल्याने कुटुंबीय तिला भक्कम साथ देत असून प्रोत्साहन देत आहेत. त्यातच शेतकरी कुटुंब असल्याने आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असूनही रुचिताला कुस्ती खेळासाठी कशाचीही कमतरता भासू देत नाही. तिला श्रीगोंदा येथील तालमीत प्रशिक्षणासाठी पाठविले. तेथे कुस्तीचे कुशल प्रशिक्षक हनुमंत फड, संजय डफळ यांच्याकडून धडे गिरवले. यासाठी तिनेही भरपूर अंगमेहनत घेतली. प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी नवनवीन डाव आखण्याचे ज्ञान मिळवले.
यामध्ये परिपूर्ण होताना ती विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाली. तेथेही प्रतिस्पर्धी कुस्तीपट्टूवर डाव टाकून विजयी होण्याचा बहुमान मिळवला. हे सर्व करत असताना सरावात मात्र कधीही खंड पडू देत नाही. शेतकरी वडील असूनही ते रुचिताच्या आहाराबाबत जागरुक आहेत. तिला दररोज दूध, केळी, सुकामेवा व फळे नियमितपणे मिळतील याची उत्तम व्यवस्था करतात. यामुळे आईवडीलांचे कष्ट, स्वतःची अंगमेहनत व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या बळावर तिने थेट राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. झारखंड येथे होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. ती महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत असून विजयी होवूनच परतणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे. यानंतर तिने आशियाई, ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी संगमनेरने अनेक खेळाडू राज्य व देशाला दिलेले आहेत. त्यात आता रुचिताची भर पडणार आहे. याबद्दल तिचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात आदिंनी अभिनंदन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.