अर्धवट धरणं भरलेल्या अहमदनगर जिल्ह्यावर समन्यायी पाणी वाटपाचे संकट! जायकवाडीत अवघा 44 टक्के पाणीसाठा; 15 ऑक्टोबरपर्यंत 65 टक्के पाणी आवश्यक…

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समन्यायी पाणीवाटपाच्या सूत्रानुसार यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील पावसाची स्थिती लहरी असून लाभक्षेत्रात कोसळलेल्या पावसाने खरीपाच्या पिकांना तारले असले तरीही जिल्ह्यातील ही तिनही धरणं अद्याप अर्धवट स्थितीतच आहेत. त्यातच आजच्या स्थितीत जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा 44 टक्के असल्याने व नियमानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत या धरणातील पाणीसाठा 65 टक्के असणे आवश्यक असल्याने गोदावरी उर्ध्वभागातील या दोन्ही धरणांमधून जायवाडीचेही पोट भरावे लागणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गणेशोत्सवा दरम्यान येणार्या पावसाच्या हस्त नक्षत्रानेही ओढ दिल्यास जिल्ह्यातील पाण्यासाठीचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर नगरजिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 76 टक्के पाणीसाठा असून पाणलोटातील पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली आहे.

सन 2005 साली मंजूर झालेल्या समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याने गोदावरीच्या उर्ध्वभागातील अहमदनगरसह नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील पाण्याचा संघर्ष ज्वलंत केला आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात कोसळणार्या पावसाचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत अथवा जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांवर पोहोचेपर्यंत वरच्याभागातील धरणांमध्ये पाणी अडविता येत नाही. 15 ऑक्टोबर रोजी गोदावरी उर्ध्वभागातील नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्याचे मोजमाप करुन जायकवाडीची तुट भरुन काढावी लागते. यापूर्वी 2012, 2013, 2014 व 2018 मध्ये जायकवाडीची तुट भरुन काढण्यासाठी ऑक्टोबरनंतर भंडारदरा व मुळा धरणातून पाणी सोडले गेले आहे. प्रवरेची उपनदी असलेल्या मुळा नदीचा धरणापासून जायकवाडीपर्यंतचा प्रवास 57 किलोमीटर तर भंडारदर्यापासून जायकवाडीपर्यंत प्रवरानदीचा प्रवास 107 किलोमीटरचा आहे.

समन्यायी पाणी वाटप मसुद्याचा फटका जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसह बागायतदारांच्या मुळाशी असून मानवतेचा भाग वगळता वरच्या धरणातील शेतीसाठीचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यापूर्वी वारंवार विरोध झाला आहे. त्यासाठी या दोन्ही नद्यांच्या खोर्यातील शेतकर्यांनी विविध कृती समित्यांच्या माध्यमातून आंदोलनेही केली आहे. यापूर्वी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडतांना गावोगावी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला आहे. यावरुन खालच्या भागासाठी पाणी सोडण्यास होणार्या विरोधाची तिव्रता सहज लक्षात येते. उत्तर नगरजिल्ह्यातील आठ साखर कारखाने गोदावरी उर्ध्वभागातील पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याचा हत्यारासारखर वापर करुन एकमेकांच्या राजकीय खोड्या काढण्यातही या कायद्याचा वेळोवेळी वापर झाला आहे. त्यातूनच येणार्या कालावधीत नाशिक, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने जायकवाडीला आवश्यक असलेले पाणी पाऊस सुरु असतानाच वाहिल्याने 2018 पासून आजपर्यंत जिल्ह्यातील बळीराजाला या कायद्याचा विसर पडला होता. यावर्षी मात्र जिल्ह्याला पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून आजच्या स्थितीत उत्तर नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये 49 हजार 919 दशलक्ष घनफूटापैकी केवळ 35 हजार 718 दशलक्ष घनफूट (76 टक्के) पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या धरणांच्या पाण्यावर जिल्ह्यातील दिडलाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यासोबतच नगर शहराच्या पिण्याच्या पाण्यासह नगर व सुपा येथील औद्योगिक वसाहतींनाही मुळा धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र यावर्षी जिल्ह्यातील पावसाचे आगार समजल्या जाणार्या घाटघरसह रतनवाडी व हरिश्चंद्रगडाच्या परिसरात पावसाचे प्रमाण 60 टक्क्यांच्या आसपास राहीले आहे. त्याचा परिणाम धरणातील पाण्याच्या आवकवर झाल्याने आजच्या स्थितीत मुळा (74.01 टक्के), भंडारदरा (84.69 टक्के), निळवंडे (77.87 टक्के), आढळा (52.83 टक्के) व भोजापूर धरणात (23.55 टक्के) इतकाच पाणीसाठा आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार 15 ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास गोदावरी उर्ध्वभागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची मोजदाद करुन त्या प्रमाणात जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागते. आज सकाळी सहा वाजता जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा 59 हजार 70 दशलक्ष घनफूट (58.11 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 33 हजार 63 दशलक्ष घनफूट (43.87 टक्के) इतकर आहे. पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास 15 ऑक्टोबरनंतर जायकवाडीच्या उपयुक्त पाणीसाठ्यातील तुट भरुन काढण्यासाठी वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या कायद्याच्या आधाराने यापूर्वी 2012, 2013, 2014 व 2018 अशा चारवेळा जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडले गेले आहे. प्रवरा पात्रातून गोदावरीपर्यंत सोडण्यात आलेल्या या पाण्यापैकी प्रत्यक्षात जायकवाडी धरणात किती पाणी पोहोचले याबाबत कोणतीही निश्चित आकडेवरी उपलब्ध नाही. त्यातच अकोले ते प्रवरा संगम या 107 किलोमीटरच्या अंतरात जागोजागी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने नदीपात्रात प्रचंड खड्डे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सोडलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे या चारही वेळा लक्षात आले आहे, त्यातून वादंगही उभे राहीले आहेत. यासर्व गोष्टींचा विचार करुन महाराष्ट्र जल नियामक प्राधिकरण काय निर्णय घेते यावरच यासर्व गोष्टी अवलंबून आहे.
सन 2018 साली या कायद्यान्वये मुळा व भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी तब्बल साडेआठ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उभा राहीला होता. यापूर्वीच्या अनुभवानुसार सप्टेंबरनंतर कोसळणारा परतीचा पाऊस बेभरवशाचा राहीला आहे. त्यातच जायकवाडीची तुट भरण्यासाठी जिल्ह्यातील धरणातून पुन्हा सोडण्याची वेळ आल्यास मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणातील आवर्तनांच्या संख्येवर त्याचा थेट परिणाम होवून या पाण्यावर अवलंबून असलेल्या सुमारे दीड लाख हेक्टरवरील शेतकर्यांना उन्हाळी आवर्तनास मुकावे लागण्याचीही शक्यता असल्याने जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात जिल्ह्यात वातावरण निर्माण होवू लागले आहे.

