निळवंडेच्या पाण्यासाठी अकोल्यात हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समितीच्या आंदोलनात सर्वपक्षीयांचा सहभाग..

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात उच्चस्तरीय कालव्यांची कामे रेंगाळली आहेत, उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडले न गेल्यामुळे अनेक गावे पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत असून उच्चस्तरीय कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आज (शुक्रवार, ता.3) रस्त्यावर उतरले आहेत. उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समिती अकोलेच्यावतीने ‘पाणी हक्क मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते त्यात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे निळवंडेच्या पाण्याने पुन्हा एकदा वणवा घेतला आहे.

निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षांचा काळ लोटला, तरी अकोले तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी अद्याप मिळलेले नाही. आपली अनेक गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. अनेक गावे अजूनही दुष्काळाच्या झळा सोसत आहोत. उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे काम दोन तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. केवळ नदीपात्रातील जलसेतूचे काम जाणीवपूर्वक अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्यामुळे या उजव्या उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडता आलेले नाही. अकोले तालुक्यातून इतर तालुक्यांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी निम्नस्तरीय कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. अत्यंत कठीण डोंगर फोडून व रस्त्यांवर पूल बांधून, ओढे नाले ओलांडत ही निम्नस्तरीय कालव्यांची कामे अतिजलद गतीने पूर्ण केली जात आहेत. उच्चस्तरीय कालव्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जलसेतमचे काम मात्र हेतूतः वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवले जात आहे. उजव्या व डाव्या कालव्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत. सिंचन क्षेत्र विस्तारण्यासाठी दिलेले पुरवणी प्रस्तावही प्रलंबित आहेत. शेतकर्यांच्या मनात याबाबत मोठा असंतोष खदखदत आहे. शेतकरी आज चारही बाजूंनी अडचणीत सापडला असताना त्यात आणखी भर म्हणून पाऊस लांबल्याने त्यांच्या काळजीत मोठी भर पडली आहे.

या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तालुक्यात पाणी हक्काचा लढा सुरू झाला आहे. आज शहरातून ट्रॅक्टर रॅली काढली, यामध्ये शेतकर्यांनी घोषणा देत अवघे शहर दणाणून सोडले. गावोगावच्या ग्रामस्थांनी याकामी पुढाकार घेत उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावे, उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावे, डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उपकालव्यांचा विस्तार करून ही कामे तातडीने पूर्ण करावे, भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील शेतीला बारमाही पाणी द्यावे, आदी मागण्या करण्यात केल्या आहेत. या आंदोलनात आमदार किरण लहामटे, शेतकरी नेते डॉ.अजित नवले, कारभारी उगले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, आप्पा आवारी, पर्बत नाईकवाडी, सुरेश भिसे, महेश नवले, बाळासाहेब भोर, विनय सावंत आदिंनी शेतकर्यांना संबोधित केले.

