अवैध वाळू उपशाच्या दंड वसुलीसाठी चक्क जमिनीवर चढवला बोजा! सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांच्या तक्रारीवरुन संगमनेर तहसीलदारांची कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मातीमिश्रीतच्या नावाखाली दिवसरात्र वाळू उपसा करणार्‍या साकूर येथील वाळूतस्कराला संगमनेरच्या तहसीलदारांनी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. मात्र वर्ष उलटूनही संबंधिताने दंडाची रक्कम न भरल्याने तहसीलदारांनी ‘त्या’ तस्कराच्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचा बोजा चढवला आहे. यानंतरही संबंधिताने दंडाची रक्कम न भरल्यास त्याची जमीन जप्त केली जाईल. दंड वसुलीसाठी वाळूतस्करावर अशा प्रकारची कारवाई होण्याची जिल्ह्यातील बहुधा ही पहिलीच कारवाई असल्याने जिल्ह्यातील वाळूतस्करांच्या मनात धडकी भरली आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी अगदी सुरुवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला, आज प्रत्यक्ष कारवाईने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मातीमिश्रीत वाळू उपसण्याची परवानगी मिळवून साकूर येथील अजीज दिलावर चौगुले याने थेट मुळा नदीपात्रातूनच वाळू उपसा सुरु केला. नदीकाठावरील अन्य काही शेतकर्‍यांनी त्यांला विरोधही करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणालाही जुमानले नाही. त्यातील काहींनी संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांना सदरचा प्रकार सांगून या प्रकरणी सहकार्य मागितले. खताळ यांनीही त्या शेतकर्‍यांच्या सोबतीने संबंधित वाळूतस्कर नियमबाह्य पद्धतीने, बेकायदा वाळु उपसा करीत असल्याबाबतचे पुरावे जमा करुन संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांसह तहसीलदारांकडे याविषयी तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली. वरील दोन्ही कार्यालयांकडून वेळेत कारवाई न झाल्याने खताळ यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडेही तक्रार दाखल केली. त्यानंतर संगमनेरच्या तहसीलदारांनी साकूर येथील मंडलाधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी पथकाने प्रत्यक्ष मुळा नदी पात्रातून शंभर ब्रास वाळूचा उपसा झाल्याचा अहवाल त्यांना सोपविला.

त्यावर कारवाई करताना तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1948 मधील कलम 48 (7), (8) अन्वये 25 फेब्रुवारी 2020 रोजी अजीज दिलावर चौगुले यांना 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला. मात्र वाळूतस्करीतून मिळालेला अफाट पैसा आणि ‘त्या’ राजकीय पुढार्‍याचा वरदहस्त या जोरावर त्याने त्या नोटीसला केराची टोपली दाखवली. या दरम्यान खताळ यांना संबंधित तस्कराच्यावतीने सचिन खेमनर या राजकीय पुढार्‍याकडून धमक्याही प्राप्त झाल्या, ‘तक्रार मागे घ्या; अन्यथा जीवाने मारु.’ वगैरे शब्दांचा प्रयोग करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र खताळ यांनी न डगमगता याबाबत शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी दंड ठोठावला त्याच दिवशी सदरचा गुन्हा दाखल झाला हे विशेष. यावरुन सदर राजकीय पुढारीच या संपूर्ण वाळूतस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येते.

संबंधित वाळूतस्कर दंड भरत नसल्याने खताळ यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये त्याच्या मालमत्तेची जप्ती करावी याबाबतचा अर्ज तहसीलदारांना दिला. त्यानुसार कायदेशीर पूर्तता करुन तहसीलदारांनी अजीज दिलावर चौगुले याला अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी साकूर येथील गट नं.122/2 क्षेत्र 35 आर, पोट खराबा 17 आर या सातबारा उतार्‍यावरील मुळा नदीच्या काठावरील 52 गुंठे जमिनीवर महाराष्ट्र शासनाचा बोजा चढवला आहे. त्यामुळे सदर वाळूतस्कराचा जमीन विक्रीचा अथवा हस्तांतरीत करण्याचा अधिकार हिरावला गेला आहे. ठराविक मुदतीत त्याने दंडाची रक्कम सव्याज न भरल्यास त्याच्या जमिनीच्या जप्तीची कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दैनिक नायकशी बोलताना दिली.

सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी तेथील शेतकर्‍यांच्या आवाहनाला साथ देत सुरुवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या दरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली. मात्र त्यांनी न डगमगता सदरचे प्रकरण तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा केल्याने दंड वसुलीसाठी जमीन जप्तीच्या दिशेने कारवाई सुरु झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा प्रकारची बहुधा जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याने जिल्ह्यातील वाळूतस्करांमध्ये हडकंप माजला आहे.


तालुक्यातील विविध नद्यांच्या पात्रातून वाळु तस्करीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांचा वापर ग्रामीणभागात निवडणूका, दादागिरी, फ्लेक्सबाजीसाठी होतो. त्यातुन तालुक्यातील वातावरण खराब होत आहे, गुन्हेगारीही वाढत आहे. या प्रकरणात तेथील काही शेतकर्‍यांच्या सांगण्यावरुन आपण सुरुवातीपासून पाठपुरावा केला. कोविडमुळे त्यात काहीसा व्यत्यय आला. मात्र तहसीलदार अमोल निकम यांनी दंडाच्या वसुलीसाठी जप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याने मी समाधानी आहे. सदरच्या वाळु तस्कराकडून दंडाची रक्कम वसुल होईस्तोवर या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे.
अमोल खताळ
सामाजिक कार्यकर्ते

Visits: 206 Today: 3 Total: 1109951

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *