केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्य सरकारकडून आकसबुद्धीने अटक ः भांगरे अकोले भापजकडून ठाकरे सरकारचा निषेध; तहसीलदारांना दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना जाणीवपूर्वक आकसबुद्धीने राज्यातील ठाकरे सरकारने कायद्याचा दुरुपयोग करुन असंवैधानिक पद्धतीने त्यांना अटक केली आहे. ही तालिबानी राजवट आहे का? असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला आहे.

मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अकोले तालुक्याच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करुन आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भांगरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, सरचिटणीस यशवंत अभाळे, सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, अ‍ॅड. भाऊसाहेब गोडसे, अ‍ॅड. दीपक शेटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष किशोर काळे, प्रसन्न धोंगडे, शिवाजी उंबरे, ज्ञानेश पुंडे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पारासूर, युवा सरचिटणीस सुशांत वाकचौरे, मनोज वावळे, सौरभ देशमुख, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

अतिशय साधे कलम असणार्‍या गुन्ह्यासाठी एवढा गाजावाजा करीत मंत्री राणे यांच्या अटकेची घाई केली. तेवढी तत्परता या सरकारने जितेंद्र आव्हाड यांनी केलेली मारहाण प्रकरणी असो वा संजय राठोड यांच्यावरील मुलीच्या आत्महत्या घटना असो, शर्जिल उस्मानी मोकाट हिंडत आहे, पालघरच्या साधू हत्याकांड प्रकरणात शेपटी घालून बसले. मात्र मंत्री राणेंच्या विरोधात लगेच कारवाई केली. एवढी तत्परता राज्य कारभार करताना कोरोनामुक्तीसाठी आरोग्य सुविधा उपलब्धतेला दाखवली नाही असा टोलाही तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी लगावला.

यावेळी विविध पदाधिकार्‍यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच महाभकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, उद्धव सरकार हाय हाय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेवटी प्रभारी तहसीलदार महाले यांना निवेदन दिले.

Visits: 132 Today: 1 Total: 1110717

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *