काम करायचे नसेल तर बदली करून घ्या ः काळे महावितरण अधिकार्‍यांना आमदार आशुतोष काळेंनी सुनावले

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
वीजेबाबत अनेक नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या तक्रारी येत आहेत. आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देऊन, काम करायचे नसेल तर बदली करून घ्या, अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले.

गौतम बँकेच्या सभागृहात आमदार काळे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन वीज पुरवठ्यातील विविध अडचणींसंदर्भात आढावा घेत, त्यांना चांगलेच फैलावर घेतले. कोपरगाव शहर व मतदारसंघात नागरिकांना विजेबाबतीत अनंत अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. दुरुस्तीची कामे रखडली आहेत. नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी अनेक रोहित्रे मंजूर केली आहेत. मात्र, रोहित्र बसविण्याचे काम घेतलेले ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. अशा ठेकेदारांवर महावितरण कारवाई का करीत नाही, असा सवाल करून, या ठेकेदारांना अभय न देता त्यांना काळ्या यादीत टाका.

शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवा. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून नवी मंजूर रोहित्रे लवकरात लवकर बसवा. यापुढे नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधित अधिकार्‍यांना भोगावे लागतील, अशी तंबी आमदार काळे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिली. यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश मुळे, राहाता विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, अभियंता शिरीष वाणी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग-प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राष्ट्रवादीचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ आदी उपस्थित होते.

Visits: 120 Today: 1 Total: 1103643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *