नेवाशामध्ये काँग्रेसकडून योगी व मोदी सरकारचा निषेध
नेवाशामध्ये काँग्रेसकडून योगी व मोदी सरकारचा निषेध
हाथरस घटनेतील आरोपींना कठोर शासन करण्यासह कृषी व कामगार कायदे मागे घेण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेतील आरोपींना कडक शासन करण्यात यावे, केंद्र सरकारने कृषी व कामगारांविषयी आणलेले काळे कायदे मागे घेण्यात यावे. या मागणीसह काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा व यास कारणीभूत असलेल्या योगी व मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत नेवासा येथे सोमवारी (ता.5) काँग्रेसच्यावतीने तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
पंचायत समितीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये काँग्रेस समितीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, जिल्हा महासचिव जाकीर शेख, शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. श्रीरामपूर रस्त्यावरील श्री खोलेश्वर गणपती मंदीर चौकमार्गे सदरचा मोर्चा तहसील कचेरीवर गेला. केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार यांच्याविषयी आणलेले नवीन काळे कायदे तातडीने मागे घ्यावे, संपूर्ण देशाला संतप्त करणारी हाथरस येथील घडलेल्या घटनेत पीडित तरुणीला न्याय मिळावा म्हणून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबातील सदस्यांना भेटावयास गेलेल्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर पोलिसांनी केलेला हल्ला ही दडपशाही असून या घटनेचा निषेध करण्यात आला. तर बँड कलावंतांना पन्नास हजार रुपये मानधन मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी मान्यवरांनी योगी व मोदी सरकारचा भाषणांतून खरपूच समाचार घेत जोरदार निषेध व्यक्त केला. त्यानंतर सदरचा मोर्चा नेवासा तहसील कार्यालयाच्या समोर आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा सरचिटणीस सुदाम कदम, प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, साहेबराव पवार, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार कांबळे, पोपट सरोदे, तान्हाजी वाल्हेकर, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मौलाना तन्वीर शेख, रावसाहेब घुमरे यांसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.