राज्यातील पालिका निवडणुकांचे पडघम वाजले! जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदांमध्ये उडणार राजकीय धुराळा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चालू वर्षाच्या शेवटी व पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुदत संपणार्या अहमदनगर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून प्रभाग रचनेची पूर्वतयारी करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोविडच्या भयातही येत्या काही दिवसांतच जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात राजकीय धुराळा उडायला सुरुवात झाली आहे. राज्य सराकारने राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक सुधारणा अधिनियमान्वये राज्यात सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एकसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने 2011 सालची जनगणना गृहीत धरुन नव्याने प्रभागांऐवजी वॉर्डरचना करावी लागणार आहे. संगमनेर शहराची लोकसंख्या विचारात घेता शहरात नव्याने 45 ते 55 वॉर्डांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्याही वाढणार असल्याने गल्लीतील नेते सक्रीय होणार आहेत.

संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 41 (1) नुसार नगरपरिषदांची मुदत संपूण्यापूर्वीच त्यांची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदत संपणार्या नगरपालिका व नगरपंचायतींची व्यापकता लक्षात घेवून वेळेत प्रभागरचना अंतिम करण्यासाठी प्रारुप प्रभागरचना सुरु करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. राज्य सरकारने 12 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषदा/नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम 2020 अन्वये राज्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभागरचना संपुष्टात आणून त्याऐवजी एकसदस्यीय प्रभागरचना लागू केली. त्यामुळे प्रत्येक प्रभाग (वॉर्ड) आता एकाच सदस्याचा असेल. त्यासाठी अलिकडच्या काळातील म्हणजे 2011 सालची लोकसंख्या गृहीत धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नगरपरिषदेची सदस्यसंख्या निश्चित करुन तितक्या प्रभागांच्या प्रारुप रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरुन 4 मार्च रोजी न्यायालयाने दिलेल्या निकालानुसारची कारवाई आरक्षणासंदर्भात असल्याने प्रारुप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडत कार्यक्रमाबाबत वेगळ्या सूचना देण्यात येतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेची तयारी सुरु करणे आवश्यक असल्याने प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या. त्यानुसार सोमवारपासून (ता.23) त्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरु होणार आहे.

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांची मुदत वरील कालावधीत संपत आहे. त्यात कोपरगाव व राहुरी (नोव्हेंबर 2021), संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, देवळाली प्रवरा, पाथर्डी व शिर्डी (डिसेंबर 2021) आणि नेवासा (मार्च 2022) या नगरपालिकांची मुदत संपत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व नगरपालिकांमध्ये सोमवारपासून (ता.23) निवडणुकीची लगबग पहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर व शेवगाव या पाच नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. त्याचप्रमाणे तेथील प्रारुप मतदार याद्यांचा कार्यक्रमही पार पडला आहे. मात्र कोविडच्या कारणाने पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली होती. श्रीगोंदा नगरपरिषदेची मुदत 2024 साली संपणार आहे. त्यामुळे पुढील कालावधीत जवळपास संपूर्ण जिल्ह्यातच राजकीय धुराळा उडायला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील तब्बल 14 नगरपरिषदांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत.

कोविड संक्रमणामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यावर्षी होवू शकली नाही. त्यामुळे प्रारुप प्रभागरचना करताना सन 2011 सालची लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. प्रभाग रचनेतील लोकसंख्या लक्षात घेता नव्याने होणार्या वॉर्डरचनेत ती तीन भागात विभागली जाणार आहे. त्यानुसार वॉर्डाची रचना करतांना बाराशे ते पंधराशे गृहीत धरल्यास संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्याही 45 ते 55 होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शहरातील पुढार्यांच्या संख्येतही जवळपास दुपटीने वाढ होईल. त्यामुळे गल्लीतील अनेक नेत्यांनी आता बळेच नमस्कार घालायला सुरुवातही केली आहे.

