विम्याचा फायदा घेण्यासाठी चक्क ट्रक चोरीचा बनाव! स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ट्रकसह केले गजाआड
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
ट्रक चोरी गेल्याची खोटी फिर्याद देवून विम्याचा लाभ घेण्यार्या दोन आरोपींना ट्रकसह गडाआड करण्यात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तर पसार आरोपी पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे (रा. प्रभाग दोन, श्रीरामपूर) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (ता. 15) रोजी रेहान आयूब शाह (वय 29, रा. बाबरपुरा चौक, पाण्याच्या टाकीजवळ, श्रीरामपूर) याने आपल्या मालकीचा दहा टायरचा ट्रक (एमएम. 17, बीवाय. 5559) क्रमांकाचा ट्रक येथील सम्राटनगर (सूतगिरणी) परिसरातील स्टील कंपनीतून गुरुवारी (ता. 12) रोजी सांयकाळी अज्ञात चोरट्याने चोरी नेल्याची फिर्याद दिली होती.
त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शहर परिसरामध्ये ट्रक चोरीच्या घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः लक्ष देत गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने गुप्त माहिती काढून खात्रीशीर पडताळणी करुन रेहान शहा व त्याच्या साथीदारांनी विमा कंपनीकडून विम्याचे पैसे वसूल करण्यासाठी ट्रक चोरी गेल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड केले.
पोलीसांनी रेहान शाह याला ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली. प्रारंभी तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपला साथीदार इत्तू शेख व पप्पू गोरे याच्या मदतीने ट्रकच्या विम्याचे पैसे विमा कंपनीकडून वसूल करण्यासाठी ट्रक चोरीस गेल्याचा बनाव करुन खोटी फिर्याद दिल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी इफ्तेकार उर्फ इत्तू इस्माईल शेख (रा. प्रभाग दोन, श्रीरामपूर) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून सहा लाख रुपये किंमतीचा दहा टायरचा ट्रक जप्त करुन शहर पोलीस ठाण्यात हजर केले.