… अन् ऊसतोड कामगाराच्या पाठीमागे बिबट्या लागतो!
नायक वृत्तसेवा, घारगाव
पहाटे पाचची वेळ अन् ऊसतोड कामगार तोडीसाठी बैलगाडीतून शेतात चालले होते. त्याच दरम्यान रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेला बिबट्या अचानक ऊसतोड कामगारांच्या पाठीमागे लागतो. तेव्हा ‘त्या’ कामगाराची चांगलीच भंबेरी उडते. हा संपूर्ण थरार पठारभागातील शेळकेवाडी येथे पहावयास मिळाला.
सध्या साखर कारखाने सुरू असून, सगळीकडे ऊसतोड सुरू आहे. अकलापूर शिवारातील शेळकेवाडी परिसरातही गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार पहाटेच आपल्या बैलगाड्या घेवून तोडीसाठी शेतात जातात. दरम्यान, आज (शुक्रवार ता.11) पहाटे पाच वाजेच्या सुमारास ऊसतोड कामगार बैलगाड्या घेवून घारगाव येथून शेळकेवाडी शिवारात जात होते. त्यातील काही बैलगाड्या पुढे गेल्या होत्या तर एक बैलगाडी मागे होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला आणि थेट बैलगाडीच्या दिशेने धाव घेतली. यामुळे कामगाराची अक्षरशः भंबेरीच उडाली आणि मोठमोठ्याने आरडाओरड करत बैलगाडी जोरजोराने पळवली. त्याचा आवाज ऐकून इतर ऊसतोड कामगारही घाबरून गेले. त्यांनी तात्काळ आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे त्याच्याही जीवात जीव आला. त्यानंतर कामगाराने सर्व हकीगत बाकीच्या ऊसतोड कामगारांना सांगितली. मात्र, केवळ दैव बलवत्तर असल्याने मी बालंबाल बचावलो असल्याची भावना बिबट्याच्या तावडीतून बचावलेल्या ऊसतोड कामगाराने व्यक्त केली.