संगमनेर खुर्दमधील वृद्ध महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन कुर्‍हाडीने वार..! शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे कोरोना महामारीतून अनेकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहे. तर दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना घडत आहेत. संगमनेर खुर्दमधील एका वृध्द महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत तिच्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.26) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेवर कुर्‍हाडीने वार करणार्‍या 25 वर्षीय युवकाविरोधात संगमनेर शहर पोलिसांत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर खुर्द येथील सिद्धकला हॉस्पिटलसमोर फिर्यादी आणि वृद्ध महिला वास्तव्यास आहे. त्यांच्या घरासमोरच आरोपी नंदू वाल्मिक गांजवे (वय 25) या आरोपीचे घर आहे. आरोपीने दारूच्या नशेत फिर्यादी आणि वृद्ध महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत वृद्धेच्या हातापायावर कुर्‍हाडीने वार केले. यामध्ये वृद्ध महिला जखमी झाली आहे.


या प्रकरणी मारहाण झालेल्या वृद्ध महिलेच्या 40 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत आरोपी नंदू गांजवे याच्याविरोधात गु.र.नं. 1814/2020 नुसार भादंवि कलम 326, 504, 506, 34 प्रमाणे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारणा अधिनियमचे कलम 3(आय)(आर)(एस), 3(2)(व्ही-ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत हे करत आहे.

जातीय अत्याचार अजूनही समूळ नायनाट झालेला नाही. वारंवार अशा घटना घडत असल्याने समाजातील सौख्य बिघडत असल्याचेच या घटनांवरुन अधोरेखित होत आहे. यासाठी अजूनही समाजात प्रबोधन होणे गरजेचे असून कायद्याची कठोर अंमलबजावणीही आवश्यक आहे. तरच जातीय अत्याचार घटनांना पायबंद घालणे शक्य होणार आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 116386

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *