वाहनाच्या धडकेतील जखमी बिबट्या सापडेना..!
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता. मात्र त्यानंतर बिबट्या शेजारीच असलेल्या जंगलात पळून गेल्याची घटना रविवारी (ता.6) रात्री घडली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी वन विभागाच्या कर्मचार्यांनी बिबट्याचा जंगलात शोध घेऊनही तो बिबट्या सापडला नाही.
खंदरमाळवाडी येथे भक्ष्याच्या शोधात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना एका अज्ञात वाहनाची धडक बिबट्याला बसली होती. त्यामुळे जखमी अवस्थेत बिबट्या काही वेळ महामार्गावरच बसून होता. त्यानंतर बिबट्या शेजारी असलेल्या जंगलात पळून गेला. रात्री वन विभागाच्या अधिकार्यांनी बराच वेळ बिबट्याचा शोध घेतला. मात्र कर्मचार्यांना पाहून पुन्हा बिबट्या पळून गेला. वन परिमंडल अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक सविता थोरात, सुजाता ठेंबरे, सुभाष धानापुणे, दिलीप बहिरट, बाळासाहेब वैराळ, आनंथा काळे आदिंनी जखमी बिबट्याचा शोध घेतला. मात्र बिबट्या सापडला नाही.