शिर्डीत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना गुलाबपुष्प राहाता न्यायालय विधी सेवा समिती व शिर्डी वाहतूक शाखेचा उपक्रम

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावर वाहन चालकाने घ्यावयाची काळजी व पाळावयाचे नियम याविषयीची जनजागृती राहाता न्यायालय विधी सेवा समिती तसेच शिर्डी शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. यावेळी वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांना उपस्थितांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

गुरुवारी (ता.19) सकाळी शिर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहाता न्यायालय विधी सेवा समिती आणि शिर्डी वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रस्त्यावरुन धावणार्‍या वाहन चालकांनी सीटबेल्ट न लावणे, विना हेल्मेट तर वाहनांना नंबर प्लेटच नसणे अशा वाहन चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे प्रबोधन करत वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले.

राहाता दिवाणी न्यायाधीश आदिती नागोरी यांच्यासह न्यायाधीश डी. ए. डोईफोडे, न्यायाधीश सरिता विश्वंभर, राहाता बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल शेजवळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक विकास देवरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे, पोलीस उपनिरीक्षक गंगलवाड यांच्यासह वकील संघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. वारुळे, अ‍ॅड. चित्रे, न्यायालय अधीक्षक लोहाटे, विधी सेवा समितीचे समन्वयक बळे उपस्थित होते. तर लक्ष्मीनगर येथील नागरिक, शिर्डी वाहतूक शाखेचे कर्मचारी, शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि वाहन चालक यांनी शिबिरास उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

Visits: 185 Today: 1 Total: 1875418

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *