समाजाला सत्प्रवृत्तीचे आकर्षण आहे तोपर्यंत गांधी जिवंत राहतील ः वाकचौरे जयहिंद लोकचळवळीच्यावतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन व्याख्यानमाला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजामध्ये जोपर्यंत सत्प्रवृत्तीच्या मागे उभे राहण्याची वृती आहे. माणसाच्या चांगुलपणाचा शोध घेण्याची जिज्ञासा आहे. तोपर्यंत समाजात गांधी नावाचा माणूस जिवंत राहील. गांधी हे सज्जनतेचे नाव आहे असे प्रतिपादन पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले.

जयहिंद लोकचळवळीच्यावतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन या आयोजित व्याख्यानमालेत महात्मा गांधी या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ. सुधीर तांबे होते. आपल्या व्याख्यानात संदीप वाकचौरे पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये गांधी नावाच्या माणसाने अहिंसेच्या मार्गाने जाऊन समाजमन उभे केले. शस्त्राने युद्ध करता येईल पण अहिंसेच्या जोरावरती स्वातंत्र्याची लढाई लढता येते हे जगाला गांधी यांनी दाखवून दिले. गांधीजी हे सत्याचा आग्रह करत सामान्यांच्या कल्याणासाठी स्वराज्य कल्पना घेऊन लढत होते. सुराज्य स्थापन करायचे स्वप्न गांधी यांनी पाहिले होते. समाजात जातीयता, धर्मभेद यांना थारा न देता सर्व माणसे एक आहे ही धारणा घेऊन स्वातंत्र्याची लढाई लढल्यामुळे सामान्य माणूस देखील त्यात सक्रीय झाला होता. सामान्यांच्या मनामध्ये इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढाईसाठी तयारी करणे ही साधी गोष्ट नव्हती. मात्र गांधी विचारांच्या पातळीवर लढाई करून इंग्रजांचे नामोहरण केले होते.

गांधीजींनी मी हिंदू आहे असे अभिमानाने सांगितले असले, तरी त्यांच्या हिंदू धर्मात अस्पृश्यतेला थारा नव्हता. त्यांनी जीवनभर माणसातील माणूसपणाचा शोध घेऊन त्याला ईश्वर मानले होते. त्यामुळे सामान्य जनतेची सेवा त्यांना अपेक्षित होती. गांधीजींच्या संदर्भाने समाजात विविध प्रकारची मते असली तरी त्यांच्या विचारांची तोडफोड करून मांडणी होत आहे. त्यामुळे गांधींना समजून घेताना त्यांच्या मूळ विचारधारेतील आणि प्रवासातील जीवन तत्त्वज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे. गांधीजींनी आयुष्यभर विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या आश्रमात कधीही समाजाच्या पैशाचा विनियोग अतिरिक्त स्वरूपात केलेला नाही. चारित्र्याशिवाय शिक्षण, श्रमाशिवाय पैसा यांसारख्या पापांच्या कल्पना मांडून त्यांनी समाजाला उन्नत करण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, गांधीजींच्या वाटेने चालत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या निमित्ताने गांधीजींचे विचारच समाजाचे उत्थान घडवून आणणार आहे. विचाराची मोडतोड करुन नव्या पिढीसमोर बद्दल गैरसमज पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहे. मात्र स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे राहिले आहे. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सोबत सामान्यांच्या उद्धाराचा विचार केला असते मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन संकेत मुनोत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राजीव साळवे यांनी करून दिला. आभार अॅड. समीर लामखडे यांनी मानले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा दुर्गा तांबे, हिरालाल पगडाल, प्रा. गायकवाड, गाथा परिवाराचे उल्हास पाटील, नाट्यलेखक डॉ. सोमनाथ मुटकुळे, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते.
