जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यालाही मिळाला मोठा दिलासा! शहरातील सहा जणांसह तालुक्यातील तेवीस जणांना कोविडचे संक्रमण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यासह आज संगमनेर तालुक्यालाही मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याची रुग्णसंख्या पाचशेच्या आंंत तर संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या पन्नासच्या आंंत येण्याची शृंखला आजही अव्याहत राहिली. आज जिल्ह्यात 353, तर संगमनेर तालुक्यात अवघे तेवीस रुग्ण समोर आले. त्यात शहरातील सहा जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 842 झाली आहे.
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या पाचशेपेक्षा खाली आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्याचा संक्रमणाचा वेग खाली येऊनही अधिक रुग्ण समोर येणार्या संगमनेर तालुक्यातूनही मागील चार दिवसांत पन्नासपेक्षा कमी रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे संगमनेरकरांना दिलासा मिळत असताना आज रुग्णसंख्या तेवीस वर आल्याने तालुक्यातील संक्रमणही आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र त्याच वेळी राज्यात डेल्टा प्लस या भयंकर व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाकडून नव्याने निर्बंध जाहीर झाले असून अहमदनगर जिल्ह्यातही येत्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे तीन, खासगी प्रयोगशाळेचे 11 व रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून 9 अशा तालुक्यातील एकूण 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील मालदाडरोड येथील 48 व 46 वर्षीय इसमांंसह 41 वर्षीय दोन महिला, इंदिरानगर परिसरातील 32 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 26 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यासोबतच तालुक्याच्या ग्रामीण भागातील सात गावातील 17 जणांनाही कोविडची लागण झाल्याचे समोर आले असून त्यात साकुर येथील 71 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 68 व 24 वर्षीय महिला, 32 वर्षीय तरुण व दहा वर्षीय मुलगा, घुलेवाडी येथील 55 व 45 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुणी, कोकणेवाडी येथील 79 वर्षीय वयोवृद्ध इसम, सांगवी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 31 वर्षीय महिला, कर्जुले पठार येथील 40 वर्षीय तरुणासह तेवीस वर्षीय महिला, कोंंची येथील 78 वर्षीय महिला व निमज येथील 45 व 29 वर्षीय महिलांसह 35 वर्षीय तरुण अशा तालुक्यातील एकूण 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येत भर पडून तालुका आता 22 हजार 842 वर पोहोचला आहे.
आज सलग पाचव्या दिवशी जिल्ह्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली राहिल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 33, खासगी प्रयोगशाळेचे 133 व रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून समोर आलेले 187 अशा जिल्ह्यातील एकूण 353 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात पारनेर 51, श्रीगोंदा 46, पाथर्डी व शेवगाव प्रत्येकी 28, राहुरी 27, नगर ग्रामीण व संगमनेर प्रत्येकी 23 कर्जत 21, राहाता 19, अकोले 17, जामखेड व श्रीरामपूर प्रत्येकी 16, नेवासा 12, अहमदनगर महापालिका क्षेत्र 11, कोपरगाव 9 व इतर जिल्ह्यातील सहा रुग्णांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 78 हजार 532 झाली आहे.