निंभाळे चौफुलीवर सलग दुसर्या दिवशीही वाटमारी! संतप्त नागरीकांचा सवाल; संगमनेरात पोलिसांचे अस्तित्त्व आहे का?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सतत रहदारीने फुललेल्या जोर्वे रस्त्यावरील निंभाळे चौफुलीवर आता वाटमारी करणार्या चोरट्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून पोलिसांचे शहरातील अस्तित्त्वच शून्य दिसू लागले आहे. ऐन स्वातंत्र्य दिनी याच परिसरात तिघा चोरट्यांनी दुचाकीवरील दोघांना लुटण्याचा प्रकार ताजा असतांना आता पुन्हा एकदा सलग दुसर्या दिवशी त्याच ठिकाणी आणखी एकाला भर रस्त्यात अडवून त्याचा मोबाईल व रोकड घेवून तिघांनी पोबारा केला आहे. संगमनेर शहराच्या गुन्हेगारी इतिहासात कधीही न घडलेल्या अशा प्रकारच्या घटना आता एकामागून एक घडू लागल्याने संगमनेर शहर पोलिसांची निष्क्रियता ठळकपणे समोर आली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना जोर्वे-वाघापूर रस्त्यावरील निंभाळे चौफुलीवर मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. पेशाने वाहनचालक असलेले प्रभाकर चंदू आव्हाड (वय 46, रा.वाघापूर) हे आपली सेवा पूर्ण करुन आपल्या दुचाकीवरुन घराकडे निघाले असता निंभाळ्यानजीक त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागे अन्य एका दुचाकीवरुन तिघेजण आले.

यावेळी पाठीमागून आलेल्या ‘त्या’ दुचाकीस्वारांनी ‘ऐऽ रुक.. रुक..’ असे म्हणत आव्हाड यांना त्यांची दुचाकी थांबवण्यास सांगितले. तरुण मुलं आहेत, रस्ता चुकली असतील या विचाराने आव्हाड यांनी आपली दुचाकी उभी केली असता समोर आलेल्या तिघाही चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या शर्टच्या खिशातील 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व तीन हजार रुपयांची रोकड काढून घेतली व ते तेथून पसार झाले. सदरचा प्रकार लक्षात येताच आव्हाड यांनी शहर पोलीस ठाणे गाठून झाली घटना कथन केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी (ता.15) रहिमपूर येथील धनंजय वर्पे व किरण वर्पे हे दोघे रात्री साडे अकराच्या सुमारास एकाच मोटार सायकलवरुन याच रस्त्याने घराकडे जात असतांना त्यांनाही असाच अनुभव आला. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी निंभाळ्याच्या चौफुलीवर येताच त्या दोघांना अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवला व त्यांच्याकडील मोबाईल व रोकड असा 15 हजारांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. हा प्रकार ताजा असतांनाच त्याच्या दुसर्याच दिवशी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुन्हा तिघांनी पाठीमागून येत एका वाहनचालकाला लुबाडल्याने यामार्गावरुन दररोज घराकडे जाणार्या नागरीकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.

खरेतर गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांनी कधीही रात्रपाळी केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे रात्रीच्या बंदोबस्तावर नेमणूक केलेले कर्मचारी ठरवून दिलेल्या ठिकाणी थांबतच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्याचा परिणाम दररोज रात्रीच्यावेळी संगमनेर शहरात चोरट्यांसाठी मोकळे रान निर्माण होत असल्याने सध्या शहराच्या सर्वच भागात चोरटे हैदोस घालीत असून शहरात पोलिसांचे अस्तित्त्व शून्य झाले आहे. वाटमारीसारख्या घटना यापूर्वी संगमनेरात कधीही घडलेल्या नाहीत, मात्र पोलिसांच्या सततच्या निष्क्रियतेमुळे आता कोणतीही गुन्हेगारी कृती शहरापासून लांब नसून सर्वत्र त्याचे स्तोम माजू लागले आहे.

