तिळवणी येथे आदिवासी तरुणास तिघांकडून मारहाण कोपरगाव तालुका पोलिसांत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यात मंजूर येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन त्यात एक ठार झाला असल्याचे प्रकरण ताजे असतानाच तिळवणी येथील एका आदिवासी तरुणास जातीचा उल्लेख करून तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथील भाऊसाहेब दगू गायकवाड हा आपले काम आटोपून घरी जात असताना त्याच्या घराजवळ पप्पू भास्कर गव्हाळे, गणेश जयवंत भुजाडे दोघे (रा. आपेगाव) व वाल्मिक भाऊसाहेब निकम (रा. उक्कडगाव) हे दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करून आरडाओरडा करत होते. तेव्हा भाऊसाहेब गायकवाड त्यांना म्हणाले, तुम्ही येथे आरडाओरडा करू नका. त्यावर आरोपींनी गायकवाड यांना तू जास्त माजला आहे. तुला चोप द्यायला लागेल असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान त्यांची आई व पत्नी आवाज ऐकून घटनास्थळी आले असताना त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ केली. जाताना तुम्ही या गावात राहाता कसे? तुमचे घरे पेटून देऊ असे म्हणून दम दिला.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 340/2022 भादंवि कलम 323, 504, 506 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचारास प्रतिबंध सुधारणा कायदा- 2015 चे कलम 3 (आय) (आर), 3 (आय) (एस) प्रमाणे वरील तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
