असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी काँग्रेसचे जिल्हाधिकार्यांना निवेदन संगमनेरात प्रांताधिकार्यांना निवेदन; विविध प्रश्न सोडविण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसच्यावतीने सोमवारी (ता.16) कामगारांच्या हक्कासाठी संसद भवन दिल्ली येथे घेराव घालण्यात आला असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

संगमनेर प्रांत कार्यालय याठिकाणी असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, डॉ. बाबासाहेब दिघे, बाळासाहेब कोल्हे, बाळकृष्ण गांडाळ, बबन खेमनर आदिंनी हे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांना दिले. अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने विविध मागण्यांसाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संसद भवनला घेराव घालण्यात आला होता. त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अरबिंद सिंह, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, समन्वयक डॉ. ममता सी. एस., राष्ट्रीय विभागीय समन्वयक मुकेश डागर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात दिलेल्या निवेदनात जिल्हा व तालुका स्तरावर शहरी रोजगार गॅरंटी कायदा अंमलात आणावा, मनेरगामधील माफियागिरी संपुष्टात आणावी, प्रवासी बस व कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, असंघटित कामगारांना थेट आर्थिक मदत करण्यात यावी, असंघटित कामगार महामंडळामध्ये कामगारांची नोंदणी प्रक्रिया त्वरीत सुरू करावी, केंद्र सरकारने कामगारविरोधी धोरणे व कायदे तातडीने रद्द करावी या मागण्यांची पूर्तता व्हावी अशा मागण्या केल्या आहेत.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे म्हणाले, भाजप सरकार खोटारडे सरकार आहे. काँग्रेसने कायम गोरगरीबांच्या हिताचे निर्णय घेतले असून सोनिया गांधी, राहुल गांधी व महाराष्ट्रात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सामान्यांसाठी काम करत आहे. काँग्रेसचा विचार हा पुरोगामी विचार आहे. गोरगरिबांना विकासाच्या वाटेवर आणणारा विचार आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे या गोरगरीब माणसांची आणखी हाल होत असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्राने चुकीचे धोरणे थांबवले नाही तर देशातील व जिल्ह्यातील हा सामान्य माणूस पेटून उठेल आणि याला जबाबदार फक्त केंद्र सरकार असेल असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.
