संगमनेरच्या वीज कंपनीकडून वृक्षसंवर्धनाच्या ‘आयचा घोऽ’! असंख्य झाडांची निर्दयी छाटणी; फांद्या तोडूनही पुरवठा मात्र खंडीतच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्‍हास होवून पृथ्वीचे संतुलन बिघडले आहे. त्यातून पर्यावरण रक्षणाच्या मोहीमा सुरु होवून केंद्र व राज्य सरकारांसह विविध सामाजिक व पर्यावरण संस्थांकडून दरवर्षी विविध उपक्रमही राबवले जातात. राज्य सरकारने गेल्याकाही वर्षात तर, वृक्षारोपण आणि संवर्धनावर भर देत दरवर्षी पावसाळ्यात कोट्यावधी झाडांच्या रोपणाचे उद्दिष्ट समोर ठेवून त्या दिशेने कामही सुरु केले आहे. संगमनेरकरांनाही वृक्षचळवळीचे महत्त्व पटल्याने गावठाणासह आसपासच्या उपनगरांमध्ये पालिकेकडून लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन होवून शहरांतर्गत झाडांची संख्या वाढत आहे. केंद्रापासून स्थानिक नागरिकापर्यंत असंख्य हात सृष्टी वाचवण्यासाठी धडपडत असताना संगमनेरची वीज कंपनी मात्र या सगळ्या प्रयत्नाच्या ‘आईचा घो’ करीत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीज कंपनी ‘आडहत्यारी’ ठेकेदाराकडून शहराच्या प्रत्येक रस्त्यावरील झाडांची अतिशय निर्दयीपणाने छाटणी करवून घेते. केवळ फांद्या छाटण्याचा हा प्रकार प्रत्यक्षात डौलदार पद्धतीने वाढलेल्या झाडांची कत्तल करणाराच ठरत असून त्यातून वृक्षसंवर्धनाच्या मूळ हेतूलाच उघडपणे हरताळ फासला जात आहे. इतके करुनही वीज कंपनी पावसाळ्यात अथवा वादळवार्‍यात कधीही अखंडीत वीज पुरवठा करु शकलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या हेतूबाबतही ‘संशय’ निर्माण झाला असून झाडांची छाटणी ‘भ्रष्टाचारा’चे कुरण ठरत असल्याचे आरोप होवू लागले आहेत.


आधुनिकतेच्या वेगात गेल्याकाही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड होवून त्याजागी रहिवाशी आणि औद्योगिक क्षेत्र उभी राहीली आहेत. देशातील पायाभूत सुविधांमध्येही वेगाने वाढ होत असल्याने त्यासाठी आवश्यक जमिनींवरील कोट्यवधी झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यातूनच जागतिक तापमानवाढीचे संकट उभे राहीले असून त्याचा थेट परिणाम निसर्गचक्रावर झाला आहे. पर्यावरणाचा प्रचंड र्‍हास होवून संकटात सापडलेल्या सृष्टीला वाचवण्यासाठी तोडलेल्या झाडांच्या अनेकपट झाडांचे रोपण होवून त्याच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. भविष्यातला धोका लक्षात घेवून जागतिकपातळीपासून अगदी ग्रामपंचायतस्तरापर्यंत वृक्षांचे महत्त्व पटवून देण्याच्या मोहीमा सुरु झाल्या असून आपल्याकडे केंद्र व राज्य सरकारांनी सामुहिकपणे अशा चळवणींना पाठबळही दिले आहे.


संगमनेरकरांनीही पर्यावरण संवर्धनाच्या या मोहीमेत सहभाग घेतला असून संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या दशकभरात शहर व उपनगरांमधील झाडांची संख्या लक्षणीय पद्धतीने वाढली आहे. वाढत्या उष्णतेच्या परिणामांपासून सर्वसामान्य माणूसही अलिप्त नसल्याने गावठाणातील गल्ल्या आणि बहुतेक उपनगरांमध्ये लावलेल्या झाडांचे नागरिकांनीच संवर्धन करुन ती वाढवली आहेत. जाजू पेट्रोल पंप ते 132 के.व्ही.सबस्टेशन, मारुती मंदिर (माळीवाडा) ते ईदगाह, देवाचा मळा, नवीन नगर रोड, जाणताराजा मैदान रस्त्यासह जनतानगर, इंदिरानगर, चैतन्यनगर, गणेशनगर, अभिनवनगर, जानकीनगर, विद्यानगर अशा कितीतरी शहरी वसाहतींनी आपापल्या भागात स्वतः झाडे लावून त्याचे संवर्धनही केले आहे. यासर्व प्रक्रियेत केंद्रापासून ते अगदी सामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण या वृक्षचळवळीत सहभागी झाल्याने समाजाच्या पर्यावरण विषयक जाणीवा जागृत होत आहेत.


पर्यावरणाच्या अनुषंगाने एकाबाजूला अतिशय दिलासादायक चित्र दिसत असताना दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनीकडून वृक्षसंवर्धनाच्या या सर्व प्रयत्नांचा ‘आयचा घो’ सुरु आहे. शहराच्या विविध भागात वीज कंपनीच्या विद्युत वाहिन्यांना वाढलेल्या या झाडांचा त्रास होतो. त्यातून कंपनीचे आर्थिक नुकसान होवून ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा करण्यात अडचणी येतात या कारणाने कंपनी दरवर्षी कोणाचीही परवानगी न घेता, परस्पर शहरातंर्गत अशा असंख्य झाडांची छाटणी करते, त्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही केली जाते. सालाबादप्रमाणे ठेका घेणारा जणू कसायाच्या आवेशातच कुर्‍हाड घेवून विद्युत वाहिन्यांच्या मार्गात दिसेल त्या झाडाची वाट्टेल तशी मनमानी छाटणी करीत सुटतो. त्याच्या छाटणीला कोणतेही मोजमाप नसल्याने छाटल्या जाणार्‍या बहुतेक झाडांची जवळजवळ कत्तलच झालेली असते. त्यामुळे वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करणार्‍यांचा दरवर्षी संताप होतो. मात्र ग्राहकसेवेसह पर्यावरणाबाबत संवेदनहीन असलेल्या वीज कंपनीला त्याचे कोणतेही सोयरसुतक वाटत नाही.


विशेष म्हणजे दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये वीज कंपनीची वृक्ष छाटणीची मोहीम ठरलेली असते. त्यासाठी ठराविक ठेकेदार वर्षभर कंपनीच्या कार्यालयातच तळ ठोकून साहेबांची हुजरेगिरी करीत असतात. संबंधित ठेकेदाराकडून शेकडों झाडांची बेमालूम पद्धतीने छाटणी होते. त्याच्या फांद्या रस्त्यारस्त्यावर अस्तव्यस्त पडतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, पादचार्‍यांना अडथळा अशा गोष्टीही दरवर्षी घडतात. पण ‘तो’ ठेकेदार मात्र रस्त्यावर पडलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावित नाही. त्यामुळे अर्धवट कामं करुन बाकीच्या पैशांचा संगनमताने भ्रष्टाचार केला जातो का? अशीही शंका निर्माण होते. वादळवार्‍यासह पावसाच्या शक्यतेने वीज कंपनीला भ्रष्टाचाराची आयती संधी दिल्याने गेल्या दोन दिवसांत शहर व उपनगरात असंख्य झाडांची निर्दयी छाटणी झाली आहे. मात्र झाडे तोडल्यानंतरही कंपनीकडून आजवर कधीही अशा स्थितीत अखंडीत वीज पुरवठा होवू शकलेला नाही.


शहरातंर्गत आणि उपनगरांमधील प्रत्येक रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून छाटलेल्या फांद्या तशाच पडून आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळाही निर्माण होत आहे. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक वीज कंपनी अथवा आडहत्यारी असलेल्या ठेकेदाराला नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत असल्याने वीज कंपनीच्या कारभाराबाबत संशय निर्माण होवून नागरिकांमधील संतापातही भर पडत आहे. स्थानिक वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी भ्रष्टाचाराच्या वलयातून बाहेर येवून थोडे सामाजिक आणि पर्यावरणाचे भान जोपासावे अशीही मागणी होत आहे.


शहर व उपनगरातील बहुतेक सर्वच रस्त्यांवरील झाडांची संख्या वाढली असून बहुतेक झाडांची चांगली वाढही झाली आहे. मात्र त्याचवेळी या प्रत्येक रस्त्यावरुन वीज कंपनीच्या विद्युत वाहिन्याही गेलेल्या असल्याने वादळवार्‍यात व पावसात वीजप्रवाह खंडीत होण्याची शक्यता असल्याचे कारण देत वीज कंपनी दरवर्षी ठेकेदार नियुक्त करुन या झाडांची बेसुमार छाटणी करते. त्यातून असंख्य झाडांच्या अस्तिवालाच नख लागत असल्याचे विरोधाभासी चित्रही दिसत आहे. कंपनीकडून दरवर्षी पर्यावरणावर होणार्‍या या आघाताला पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. अन्यथा संगमनेरात वृक्षसंवर्धनाच्या मोहीमेलाच बाधा निर्माण होवू शकते, याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.

Visits: 365 Today: 2 Total: 1104460

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *