संगमनेर महाविद्यालय म्हणजे गुणवत्तेची शाश्वत हमी ः डॉ. मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अध्यापन, संशोधन आणि समाजसेवेचा प्रचंड वसा संगमनेर महाविद्यालयास लाभला आहे. महाविद्यालयात फक्त शिक्षणच दिले जात नाही, तर उद्याचे आदर्श संशोधक निर्माण करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राचार्य म. वि. कौण्डिन्य संशोधन प्रकल्प स्पर्धा होय. यामुळेच संगमनेर महाविद्यालय गुणवत्तेची शाश्वत हमी देते, असे गौरवोद्गार संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी काढले.

शिक्षण प्रसारक संस्थेचे संगमनेर महाविद्यालयात विविध विभागात कार्यरत असणार्या आठ सहयोगी प्राध्यापकांची प्राध्यापक (प्रोफेसर) पदावर निवड झाल्यानंतर शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना डॉ. संजय मालपाणी म्हणाले, आजपर्यंत साडेसहा हजार संशोधन प्रकल्प महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले आहेत. संशोधनाविषयी विद्यार्थ्यांची तयारी करत असताना, प्राध्यापकांनींही अद्ययावत राहणे गरजेचे आहे. आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अध्यापन, शोधनिबंध, लेखन आणि संशोधन या कार्यात नेहमीच आघाडी घेतली आहे. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. उज्ज्वल शिक्षण संशोधनाची परंपरा लाभलेल्या संगमनेर महाविद्यालयात सहयोगी पदावरून प्राध्यापक पदावर बढती मिळणे हे गौरवास्पद आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, शिक्षक प्रतिनिधी प्रा. सुरेश भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रो. डॉ. रवींद्र ताशिलदार, प्रो. डॉ. उमेश जगदाळे, प्रो. डॉ. अशोक लिंबेकर, प्रो. डॉ. बी. व्ही. चव्हाण, प्रो. डॉ. सुवर्णा बेनके, प्रो. डॉ. वंदना भवरे, प्रो. डॉ. गोरक्षनाथ सानप यांचा सत्कार करण्यात आला.
