रंधा धबधब्यावर उभारणार महाराष्ट्रातील पहिला ‘स्काय वॉक’ : आ. डॉ. लहामटे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकारांशी संवाद; तालुक्यातील विकासकामांची दिली माहिती..

नायक वृत्तसेवा, अकोले
निसर्गाने भरभरुन सौंदर्य दिलेल्या अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने खुंटलेला विकास करण्याचा चंग आपण बांधला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तालुक्यासाठी पावणे चारशेे कोटीहून अधिक रुपयांचा निधी आणला व त्यातून पर्यटनाचा आत्मा समजल्या जाणार्‍या रस्त्यांसह विविध कामे सुरु केली आहेत. आजवर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेल्या रंधा धबधब्याच्या विकासाचा आराखडाही तयार झाला असून लवकरच पर्यटकांसाठी रंध्यावर काचेचा पूल (स्काय वॉक) उभारला जाणार आहे, त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून अडीच कोटी रुपये प्राप्तही झाल्याची माहिती अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी दिली.

आजच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधीत आमदार डॉ.किरण लहामटे यांनी विकासाचा मुद्दा घेवून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कोणावरही थेट टिका न करता त्यांनी यावेळी गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामांचा लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडतांना आगामी काळात तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने होणार्‍या विकासाचे ‘व्हिजन’ही पत्रकारांसमोर मांडले. यावेळी अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे उपस्थित होते. अवघ्या अर्धा तास झालेल्या या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. लहामटे यांनी घाटनदेवीपासून पठारभागापर्यंतच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला.

संपूर्ण आदिवासी तालुका असलेल्या अकोल्याला निसर्ग सौंदर्याचे देणं प्राप्त झाल्याचे सांगताना यावर्षीच्या अर्थसंकल्पात तालुक्यासाठी सव्वाशे कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील रंधा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र असल्याने त्याचा विकास होणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी येत्या काही कालावधीत पाच कोटी रुपये खर्च करुन रंधा धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला तर देशातील अवघा सहावा काचेचा पूल (स्काय वॉक) उभारणार असल्याचे ते म्हणाले. या पुलाचे काम करणार्‍या ठेकेदाराकडूनच घाटघरच्या घाटनदेवी परिसराचाही विकास नियोजीत असून त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची शिखरस्वामीनी असलेल्या कळसूबाईच्या विकासासाठी रोप-वे उभारण्याची योजना आहे, त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. मात्र काहींनी पायथ्याच्या ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण केल्याने तेथील काम खोळंबले आहे. त्यासाठी आपण तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार आहोत. तालुक्यातून वाहणार्‍या मुळा व प्रवरा या नद्यांचे सुशोभिकरण करण्याचाही आपला मानस असल्याचे आमदार डॉ.लहामटे यांनी यावेळी सांगितले.

कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांच्या काळात तालुक्यात आरोग्या सुविधा उभारण्यातही आपण यशस्वी झाल्याचे सांगतांना त्यांनी आमदार निधीतून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका, कोविड सेंटर व औषधांचा लेखाजोखा मांडला. येत्या चार महिन्यात अकोल्यात उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पूर्ण होईल व अकोलेकरांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, त्यासाठी 45 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून अर्थमंत्री अजीत पवार यांच्याकडून तो उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले. शहरातंर्गत विकासासाठीही नगरपंचायतीला पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

निळवंडे धरणाच्या कालव्यातून अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळालेच पाहिजे ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे सांगत येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत उजव्या कालव्याद्वारे शेतकर्‍यांना पाणी मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पिंपरकणेच्या पुलाला वेळोवेळी वेगवेगळे अडथळे आले, मात्र हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आपण मनापासून प्रयत्न करीत आहोत. पुढील दोन वर्षात या पुलासह येत्या काही महिन्यात कोतुळचा पूल पूर्ण होणार आहे. एकंदर संपूर्ण अकोले विधानसभा मतदारसंघात सर्वत्र रस्त्याची व विकासाची कामे सुरु आहेत. आत्तापर्यंतच्या आपल्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत तालुक्याच्या विकासासाठी आपण पावणे चारशेहून अधिक कोटी रुपयांचा मिळवला असून उर्वरीत कालावधीतही तेवढा निधी मिळवून विकासाच्या दृष्टीने अकोले तालुका संपन्न करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने आपला विजय ऐतिहासिक ठरला त्याचप्रमाणे आपल्या कारकीर्दीत ऐतिहासिक निधी मिळवून अकोल्याचा विकास साधणार असल्याचा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Visits: 23 Today: 2 Total: 115205

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *