मुळा धरणातून खरीपाला पाणी मिळणार ः पोटे

नायक वृत्तसेवा, नेवासा
शासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेऊन मुळा धरणातून खरीप पिकांसाठी तातडीने पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी दिली.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक महादेव आव्हाड, नेवासा तालुका सरचिटणीस जालिंदर अरगडे यांच्या शिष्टमंडळाने 10 ऑगस्ट रोजी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सोडावे या मागणीचे निवेदन दिले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तालुक्यांमधे पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन, कपाशी, तूर, बाजरी, भुईमूग तसेच फळबागांना पाण्याची खूप आवश्यकता असून मुळा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने खरीप पिकांसाठी मुळा धरणातून त्वरीत आवर्तन सोडावे अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पोटे यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवर्तन सोडण्याची निकड समजावून सांगितली. या चर्चेदरम्यान राज्यमंत्री कडू यांनी कार्यकारी अभियंता पाटाील यांना शासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेऊन मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची सूचना केली.

Visits: 238 Today: 1 Total: 2128789

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *