अबब! शासकीय जमिनीत तीनशे ब्रास मातीमिश्रीत वाळूचा साठा! नाशिक-नगरच्या पथकाची कारवाई; तस्करांच्या वलयातच राहणारे ‘प्रभारी’ मात्र अनभिज्ञ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील सर्वच नद्यांमधून होणारी वाळूतस्करी आता नवीन राहिलेली नाही. राजकीय आशीर्वाद मिळविणार्या अनेकांनी काही अधिकार्यांना हाताशी धरुन तालुक्यातून वाहणार्या पाचही नद्यांचे पात्र अक्षरशः पोखरुन काढले असताना आता अहमदनगर आणि नाशिकच्या गौण खनिज सनियंत्रण पथकाने थेट पठारभागातील खैरदर्यात छापा घालून तब्बल तीनशे दहा ब्रास मातीमिश्रीत वाळूसह एक हायवा जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. जवळपास शंभर किलोमीटर अंतरावरील पथकाने तालुक्यात येवून ही कारवाई केली, मात्र तालुक्याच्या ‘प्रभारी’ अधिकार्याला त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे या कारवाईसह ‘प्रभारी’ तहसीलदारांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु असून तस्करासोबत त्यांच्या संभाषणाची जुनी ऑडियो क्लिपही व्हायरल झाली आहे. अद्यापपर्यंत मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
सुसंस्कृतपणाची शेखी मिरवणार्या संगमनेर तालुक्यात गेल्या काही वर्षात बोकाळलेली वाळूतस्करी आज गुन्हेगारी स्वरुपात समोर येऊ लागली आहे. तालुक्यातून वाहणार्या मुळा, प्रवरा, म्हाळुंगी, आढळा व कास या पाचही नद्यांमध्ये वाळूतस्करांच्या संघटित टोळ्या निर्माण झाल्या असून त्यांना राजकीय आशीर्वाद असल्याने या टोळ्यांना आता गुन्हेगारी स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे कधीकाळी सुसंस्कृत असलेल्या संगमनेर तालुक्याचे सामाजिक वातावरणच गढूळ झाले आहे. पठारभागातील मुळा नदीत तर वाळूतस्करांचा अक्षरशः हैदोस सुरु असून दररोज दीडशे ते दोनशे हायवा, डंपर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवसरात्र वाळू उपसा सुरु आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी खैरदरा येथील एका वाळूतस्कराने तत्कालीन नायब तहसीलदार व सध्या प्रभारी असलेल्या तहसीलदारांना फोन करुन साधलेल्या संवादाची ऑडियो क्लिप तेव्हा आणि आज पुन्हा व्हायरलही झाली, मात्र अद्यापपर्यंत ‘त्या’ महोदयांवर कारवाई तर सोडाच साधी चौकशीही झाली नाही. यावरुन येथील वाळूतस्करीला राजकीय वलय असल्याचे सिद्ध होते.
सध्याचे प्रभारी आणि पठारभागातील वाळूतस्करांच्या स्नेहमय संबंधाचे आणखी एक मोठ्ठे उदाहरण मंगळवारी समोर आले असून चक्क अहमदनगर आणि नाशिक येथील पथकाने जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास करुन पठारावरील अडगळीत असलेल्या खैरदरा येथील नदीपात्रालगत कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मुळा धरणाच्या जून्या आराखड्यानुसार सदरची जमीन शासकीय मालकी हक्काची असून वहिवाटीद्वारा कैलास श्रीपत मोरे, छबाजी उमाजी मधे व वसंत सोनबा मधे (सर्व रा.खैरदरा, नांदूर खंदरमाळ) यांच्या ताब्यात आहे. याच जमिनीत या तिघांनी मातीमिश्रीत वाळूचा तब्बल तीनशे दहा ब्रासचा ढिग लावून ठेवला होता. नाशिकचे जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील व अहमदनगर येथील वसीम सय्यद यांनी मंगळवारी थेट साठा केलेल्या जागी छापा घातला. यावेळी राजेंद्र गुलाब दुधवडे या इसमाच्या मालकीचा हायवा (क्र.एम.एच.14/ई.एम.6542) वाळू वाहण्याच्या हेतूने तेथेच उभा असल्याचे या पथकाला आढळले.
पथकातील अधिकार्यांनी कारवाई केल्यानंतर डोळासण्याचे मंडलाधिकारी किसन लोहरे यांना वरील चौघांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून हायवासह संपूर्ण वाळू जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पठारभागावर ‘खास’ प्रेम असलेल्या व सध्या प्रभारी तहसीलदार असलेल्या अधिकार्याला या कारवाईबाबत कोणतीही पूर्वसूचना नव्हती, अन्यथा नाशिक व नगरमधून आलेल्या अधिकार्यांना हात हलवितच परतावे लागले असते अशी चर्चा आता संपूर्ण पठारभागात सुरु आहे.
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन नायब तहसीलदार व सध्याचे प्रभारी यांना खैरदरा येथील एका वाळूतस्कराने फोन केला होता. यावेळी या दोघांमध्ये जवळपास चार मिनिटांचे संभाषण झाले. संबंधित तस्कराने नावासह मुळा नदीतून दररोज होणार्या तस्करीचा उल्लेखही केला. त्यावर आजच्या प्रभार्यांनी ‘एकमेकांत मिसळून धंदा करा’ असा मोलाचा सल्लाही दिला. या घटनेला काही महिन्यांचा काळ लोटला असला तरीही या अधिकार्याचे मात्र काहीही वाकडे झाले नाही. आता नाशिक आणि नगरच्या पथकाने त्यांच्याच अधिकारात मोठी कारवाई केली आहे. मात्र त्याचाही या ‘प्रभारी’ अधिकार्यावर कोणताही परिणाम होणार नाही हे ‘अटळ’ आहे.