एसटी संपामुळे बाभळेश्वर बसस्थानकात घाणीचे साम्राज्य अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍यांचीही परिसरात ‘दबंगगिरी’

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील बाभळेश्वरसह मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या नगर-मनमाड महामार्गावरील अनेक बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकांनी या आवारामध्ये ट्रकसारखी साधने आणून लावली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे नगर-मनमाड रस्त्यावरील अनेक बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात मोठ्या प्रमाणात शुकशुकाट दिसत असून यामध्ये काही वाहनधारकांनी आपली वाहने बिनधास्तपणे बसस्थानकाच्या आवारात आणून उभी केलेली दिसत आहेत. संपात आगार प्रमुखांचे कार्यालय देखील बंद अवस्थेत आहे. या परिसरात मात्र तळीरामांचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसत आहे. बाभळेश्वर येथील बसस्थानकामध्ये तर दिवसा व रात्रीच्या वेळेस वापर होतानाचे चित्र अनेक नागरिकांना सध्यातरी पाहावयास मिळत आहे. याचबरोबर या बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचेही साम्राज्य पसरलेले आहे. नागरिकही लघुशंकेसाठी या परिसराचा उपयोग करीत आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सुरू असणारा एसटी बसचा संप व वापरात न येणार्‍या बस स्थानकाचा परिसराचा अनेकजण विविध कारणांसाठी वापर करत आहे. यामुळे या परिसरातील अनेक नगर-मनमाड रस्त्याजवळ असणार्‍या स्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणार्‍यांचीही संख्या मोठी झाली आहे. या गाड्या रस्त्याच्या मधील भागी उभ्या राहून प्रवासी भरण्याचे काम करत असल्याने याचाही इतर साधनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी बाभळेश्वर चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. याकडे मात्र स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा यांनी लक्ष घालून येथील वाहतूक सुरळीत कशी होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ व वाटसरु करीत आहेत.

Visits: 97 Today: 1 Total: 1107337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *