‘लिबर्टी अर्थवेअर आर्ट’ लवकरच महाराष्ट्रात नावारुपाला येईल ः देशमुख श्री गणेश मूर्ती उत्पादन कारखाना व दालनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पर्यावरण क्षेत्रात काही संघटना व व्यक्ती झाडे लावण्याचे काम करतात. परंतु त्यात किती झाडे जगतात हा संशोधनाचा विषय आहे, असा प्रश्न उपस्थित करुन काहीजण फक्त प्रसिध्दी पुरते पर्यावरण क्षेत्रात काम करतात. या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या लिबर्टी अर्थवेअर आर्ट या गणपती मूर्ती तयार करणार्या संस्थेने लाल व शाडू मातीच्या पर्यावरणपुरक गणपती मूर्तींची निर्मिती केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही संस्था प्रत्यक्ष काम आहे. लवकरच या संस्थेचे नाव महाराष्ट्रात नावारुपाला येईल असा आशावाद समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी व्यक्त केला.
संगमनेरातील लिबर्टी अर्थवेअर आर्ट या संस्थेच्या श्री गणेश मूर्ती उत्पादन कारखाना व दालनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेचे मोहन जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष शुभम जोर्वेकर, प्रहार संघटनेचे राजेश वाकचौरे, संगमनेर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे, स्ट्रॉबेरीच्या संचालिका संज्योत वैद्य, संस्थेच्या संचालिका अलका हासे, छाया उपाध्ये, वंदना जोर्वेकर, पुजा वाकचौरे, छाया मुळे, महाव्यवस्थापक भानुदास उपाध्ये, व्यवस्थापक राजेंद्र हासे, व्यवस्थापक हेमंत जोर्वेकर, सहा. महाव्यवस्थापक सदाशिव मुळे, योगेश शिंदे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले, माणसाने माणसासारखे वागणे हा खरा धर्म आहे. मी स्वत: भगवंताचा अंश आहे ही श्रध्दा प्रत्येकाने ठेवावी. सर्वांवर प्रेम करा हाच खरा धर्म आहे. त्यांनी धर्माची व देवाची व्याख्या सांगत हिंदू धर्मात माणूस मृत्यू पावल्यावर अग्निसंस्कार केले जातात व राहिलेली राख नदीमध्ये विसर्जित केली जाते. त्यामुळे जल प्रदूषण होवून पर्यावरणाचा र्हास होतो. हे टाळून आपल्या शेतावर अथवा आपल्या जागेत खड्डा खोदून त्यात ती राख व त्यात एक झाड लावा व जगवा, म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होईल. गणेशभक्तांनी धर्मशास्त्रानुसार मातीच्या गणपतीची स्थापना करावी. मातीच्या गणपतीचे विघटन लवकर होते, त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत नाही. लग्न समारंभातील आहेर येणे-देणे ही प्रथा बंद पडलेली आहे. आहेर केल्यावर त्यातून लग्नाचा काही खर्च भागविला जातो, त्यामुळे मुलीच्या वडिलांना मदतच होते. लग्न समारंभात परत एकदा ही प्रथा चालू झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी उद्योजक प्रकाश हासे, संजय दिघे, नानासाहेब वर्षे, अण्णा कानवडे, शेखर आसने, संदीप कासट, अतुल कासट, सौदामिनी कान्होरे, निवृत्ती हासे, शांताराम सिनारे, सोपान सहाणे, शंकर गोर्डे, लहानू हासे, मधुकर हासे व गणपती कारखान्यातील कारागिर व कामगार उपस्थित होते.