भाजपमधील ‘शकुनी’ला ‘मामाजीं’च्या कार्यक्रमातच चोपले! वायफळ बडबड भोवली; महायुतीत विरजण कालवण्याचाही सतत प्रयत्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नगरसेवकपदासह पक्षातील विविध संघटनात्मक पदांचा उपभोग घेवूनही असमाधानी असलेल्या भाजपमधील एका आधुनिक शकुनीला अखेर गुरुवारी त्याच्या कर्माची फळं चाखावी लागली. गेल्या मोठ्या कालावधीपासून महायुतीच्या एकसंघतेत विरजण कालवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या या जिल्हा पदाधिकार्याने विधानसभा निवडणुकीनंतर आमदार अमोल खताळ यांच्या एका समर्थकाबाबत खासगी टिपण्णी केली होती. त्याचा परिणाम लाडली बहेनाच्या माध्यमातून देशभर ‘मामाजी’ म्हणून ओळखल्या जाणार्या केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहाण यांच्या संगमनेर भेटीनंतर काही वेळातच त्याला यथेच्छ चोप खावा लागला. या घटनेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत त्यांच्यातील वादावर पडदा टाकला. मारहाणीनंतर या महाशयांनी शहर पोलीस ठाण्यात जावून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही.
विद्यमान केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहाण गुरुवारी (ता.2) शनीशिंगणापूरहून नाशिकला जाताना संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह स्थानिक महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संगमनेर भाजपमध्ये ‘शकुनी’ म्हणून ओळखल्या जाणार्या आणि गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या मैत्रीपूर्ण संबंधात विरजण टाकण्याचे आरोप झालेला भाजपचा ‘तो’ जिल्हा पदाधिकारीही हजर होता. या कार्यक्रमाला आमदार खताळ उपस्थित असल्याने त्यांच्यासोबत त्यांचे काही समर्थकही गोळा झाले होते. त्यातीलच एकावर काही दिवसांपूर्वी भाजपमधील या शकुनीने खासगी टिपण्णी केली होती.
गुरुवारच्या कार्यक्रमात टीका करणारा आणि झालेला असे दोघेही समोरासमोर होते, मात्र मागे झालेल्या विषयावरुन आज काहीतरी अघटीत घडेल असे कोणालाही वाटले नसेल. पण म्हणतात ना, एकदा पापाचा घडा भरला की मग फक्त ‘त्या’ क्षणाचीच प्रतिक्षा असते. त्याप्रमाणे खर्या मामाजींच्या भेटीचा कार्यक्रम आटोपून ते नाशिककडे रवाना होताच आमदार खताळ यांच्या ‘त्या’ समर्थकाने आपला मोर्चा आधुनिक काळातील ‘शकुनी’च्या दिशेने वळवला आणि त्याला त्याच्या खासगी टिपण्णीची आठवण करुन देत थेट विश्रामगृहाच्या भिंतीत घालून त्याला गचांडले. हा प्रकार सुरु असतानाच अन्य एकाने आपल्या मनातील रागाला वाट करुन दिली आणि त्याने कोणताही विचार न करता थेट लाथ घालून त्या शकुनीचा पृष्ठभाग सुजवला.
तो पर्यंत तिघांमधील वादाची चर्चा शासकीय विश्रामगृहावर जमलेल्या प्रत्येकाला समजल्याने त्यांनी तेथे धाव घेत तिघांमध्ये सुरु असलेल्या वादावर पडदा टाकला. यावेळी चोपणार्या दोघांनी आपण याला का मारले त्यामागील कारणांचाही ऊहापोह केला. तो ऐकून घेतल्यानंतर भाजपमधील या शकुनीच्या वेगवेगळ्या करामतीही चर्चेत आल्या व त्यातूनच हा कोणाच्या तरी इशार्यावरुन महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि त्यातून दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची गंभीर बाबही समोर आली. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे बहुतेक सर्वच पदाधिकारी उपस्थित असल्याने त्यांच्याही कानावर यासर्व गोष्टी घालण्यात आल्या. मात्र राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असूनही आपल्या मनासारखे फासे पडत नसल्याने विचलीत झालेल्या शकुनीने त्याकडे दुर्लक्ष करीत एका युवानेत्यासह थेट शहर पोलीस ठाणे गाठले.
यावेळी त्याने शासकीय विश्रामगृहावरील घटनेचा संदर्भ देत मारहाण करणार्या ‘त्या’ दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्याला फारकाही महत्त्व दिले नाही. त्यातच सदरचा पदाधिकारी पोलीस ठाण्यात गेल्याने तक्रार दाखल झाल्यास महायुतीचे वाभाडे निघायला नकोत म्हणून अन्य पदाधिकारी व कार्यकर्तेही पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी काहींनी ‘त्या’ पदाधिकार्याने वेगवेगळ्या सोशल समूहात आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीबाबत केलेल्या वक्तव्याचे स्क्रिनशॉटही दाखवले, त्यावरुन मार खाणारा भाजपचा ‘तो’ जिल्हा पदाधिकारी महाभारतातील शकुनीचा वंशज असल्याचेही स्पष्ट झाले. त्याने केलेल्या काही पोस्ट आक्षेपार्ह असल्याने पोलिसांनी त्यावरुन गुन्हा दाखल करण्याचीही तयारी दाखवली होती, मात्र पक्षातंर्गत विषय असल्याने अन्य पदाधिकार्यांनी त्याला नकार दिला.
त्यामुळे घडल्या घटनेबाबत शासकीय दप्तरी कोणतीही नोंद झाली नसली तरीही शासकीय विश्रामगृहावर भाजपमधील शकुनीला चोपल्याची वार्ता मात्र झपाट्याने शहरात पोहोचली आणि कट्ट्याकट्ट्यावर ‘तो’ पदाधिकारी, त्याने उपभोगलेल्या नगरसेवकपदाच्या काळातील तडजोडी, स्वपक्षातच गटबाजीला प्रोत्साहन देण्याचा प्रकार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीच्या एकसंघतेला तडा देण्याचे प्रयत्न यावर मात्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आगामी कालावधीत भाजपमधील स्थानिक पदाधिकार्यांच्या निवडी आहेत. त्या पार्श्वभूमीवर या शकुनीला कोणतेही संघटनात्मक पदं मिळू नये व त्यातून महायुतीचे नुकसान होवू नये यासाठी भाजपमधील एकगट आता सक्रिय झाला आहे.
अतिशय महत्त्वकांक्षी म्हणून ओळखला जाणारा भाजपचा हा जिल्हा पदाधिकारी गेल्याकाही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांमध्ये विरजण कालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अंतर्गत आरोप आहेत. त्यातून त्याला नेमकं कोणाचं हित साधायचंय?, कोणाच्या सांगण्यावरुन तो असे प्रकार करतोय?, महायुतीचा विद्यमान आमदार असतानाही ‘तो’ शिवसेनेचा आहे, आपला नाही असे म्हणून तो नेमका कोणाच्या मनात संभ्रम निर्माण करतोय असे अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित झाल्या असून पक्ष त्याची किती गांभीर्याने दखल घेतो याकडे भाजपमधील निष्ठावानांची नजर खिळली आहे.