सर्वांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवू ः पाटील
सर्वांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवू ः पाटील
नायक वृत्तसेवा, शिर्डी
अहमदनगर जिल्ह्या सुरू असलेले अवैध धंदे, वाळूतस्करी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत, असा विश्वास नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आज सोमवारी (ता.2) शिर्डीत आले होते. त्यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस कार्यालय अंतर्गत येणार्या पाचही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव ग्रामीण, राहाता, लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी उत्तर नगर जिल्हा तसेच शिर्डी उपविभागीय कार्यालयांतर्गत येणार्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये अवैध धंदे, वाळूतस्करी व गुन्हेगारी या सर्वांचा आढावा पाटील यांनी घेतला. यापुढे या सर्व पोलीस ठाण्यांतर्गत अवैध धंदे, वाळूतस्करी व गुन्हेगारी त्वरीत बंद करण्यासाठी सक्त सूचना केल्या. त्यानंतर शिर्डी पत्रकार संघाच्यावतीने संस्थापक जितेश लोकचंदाणी, अध्यक्ष किशोर पाटणी, कार्याध्यक्ष राजेंद्र बनकर, सदस्य हेमंत शेजवळ, विनोद जवरेंनी त्यांचा सत्कार करुन स्वागत केले. शेवटी साईबाबांचे मंदीर बंद असल्याने बाहेरुनच दर्शन घेऊन रवाना झाले.