संगमनेर भाजपकडून महावितरणच्या कारभाराविरोधात संताप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दहा महिन्यांपासून वीजमीटरचे वाचन (रिडींग) वेळेवर घेतले गेले नाही. प्रत्यक्ष वापराप्रमाणे वीज बिल तर मिळाले नाही. शिवाय राज्य सरकारने सवलत देण्याचे घोषित करूनही उलट वाढीव दराने वीज बिल वसुली करणार्या महावितरणच्या विरोधात संगमनेर भारतीय जनता पक्षाने तीव्र संताप व्यक्त करुन शुक्रवारी (ता.5) ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले होते.

संगमनेरातील नवीन नगर रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. थकीत वीज बिलासाठी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, अचानक वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत ते बंद व्हावेत, शेतीपंपासाठी दिवसातील 12 तास सलग पुरवठा व्हावा, कृषिपंपांचे पूर्ण बिल माफ करावे, रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क कमी करावे आणि लवकरात लवकर द्यावा अशा मागण्या भाजपच्यावतीने करण्यात आल्या. सदर आंदोलन भाजपचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे यांच्या नेतृत्वाखाली शिरीष मुळे, सतीश कानवडे, हरिश्चंद्र चकोर, कोंडाजी कडनर, संजय नाकिल, विठ्ठल शिंदे, सीताराम मोहरीकर, प्रवीण कर्पे, वैभव लांडगे, आरती पठाडे, भैय्या परदेशी, किशोर गुप्ता, काशिनाथ पावशे, दीपेश ताटकर, भारत गवळी आदिंनी केले.
