संगमनेरातील रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 97 टक्क्यांवर! मंगळवारी शहरातील एकासह सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे कोविडवरील भारतीय लस देशाभरातील विविध राज्यांमध्ये पोहोचवण्याचे काम सुरु झालेले असताना दुसरीकडे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्यासोबतच उपचारांती रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता 97.15 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे देशाचा प्रवास आता कोविड मुक्तीच्या दिशेने सुरू झाल्याचे समाधानकारक दृष्य सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. मंगळवारीही रुग्णसंख्येत मोठी घट होवून शहरातील एकासह एकूण सात जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आणखी पुढे जात 6 हजार 151 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत कोविडने तालुक्यातील 51 जणांचे बळीही घेतले आहेत.
मंगळवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात कोविशील्ड लसींचा पुरवठा सुरू करण्यात आला. या वृत्ताने देशभरासह संगमनेरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदात रात्री उशीराने आणखी भर पडून तालुक्यातील दैनंदिन रुग्णसंख्याही आणखी खालावत चक्क एकूण रुग्णसंख्येची वाढच एकेरीत आली. गेल्या बारा दिवसांत केवळ पाचवेळा रुग्णसंख्या दुहेरीत तर दोनवेळा निरंक आणि सातवेळा एकेरीत आली आहे. त्यातून बारा दिवसांत 11.08 या सरासरीने 133 रुग्ण समोर आले. यामध्ये शहरी 41 (सरासरी 3.42) व ग्रामीण भागातील 92 (सरासरी 7.67) रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी (ता.12) आढळलेल्या अवघ्या सात रुग्णांमध्ये शहरातील कोष्टी गल्लीतील 51 वर्षीय इसमासह ग्रामीण भागातील प्रतापपूर येथील 36 वर्षीय तरुण, झोळे येथील 38 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 40 वर्षीय महिला, अमृतवाहिनी वसाहतीतील 77 वर्षीय ज्येष्ठासह 68 वर्षीय महिला व विजय कॉलनीतील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. काल तालुक्याच्या रुग्णसंख्येत सात जणांची भर पडून एकूण संख्या आता 6 हजार 151 वर पोहोचली आहे. कोविडने आत्तापर्यंत तालुक्यातील 51 जणांचा बळीही घेतला असून चालू महिन्यात आत्तापर्यंत चार जणांचा जीव गेला आहे.
संगमनेर तालुक्यातील एकूण कोविड बाधितांची संख्या सहा हजारांच्या पल्याड गेली असली तरीही आजच्या स्थितीत त्यातील केवळ 125 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. आत्तापर्यंत तालुक्यात 6 हजार 151 रुग्णसमोर आले असून त्यातील 5 हजार 976 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात अत्यंत दिलासादायक वाढ झाली असून सद्यस्थितीत तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण आता 97.15 टक्क्यांवर तर कोविड बाधित होवून मृत्यू होण्याचे प्रमाण 0.81 टक्के झाले आहे. येत्या 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाचा शुभारंभ होत असल्याने कोविडचा अंतही टप्प्यात दिसू लागला आहे.
पुणे आणि हैद्राबाद येथील औषध प्रयोगशाळांमधून देशभरात कोविड लसचा पुरवठा सुरु झाला आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभरात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होणार असून संगमनेरातील आरोग्य सेवकांना लस देण्यासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात सज्जता करण्यात आली आहे. सुरुवातीला कोविडच्या लढ्यात सुरुवातीपासून शड्डू ठोकून असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील देवदूतांना ही लस मोफत दिली जाणार आहे. त्यानंतर अन्य कोविड योद्ध्यांचेही लसीकरण सुरू होणार आहे.