गोवत्स द्वादशीच्या दिनी संगमनेरात ‘गो ग्राम परिक्रमा’! जागोजागी गोमातेचे पूजन; गोरक्षणासाठी हिंदुत्त्ववादी संघटनांचा अभिनव उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बेकायदा कत्तलखान्यांवरील छाप्याच्या चर्चा अद्यापही सुरु असताना मानवी जीवनात गाईचे महत्त्व पटवून देणार्‍या ‘गो ग्राम परिक्रमा’ या अनोख्या उपक्रमाचे संगमनेरात आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्यावतीने आयोजित या उपक्रमाला संगमनेरकरांनीही मोठा प्रतिसाद दिला. अकोले नाक्यापासून सुरु झालेल्या या गो परिक्रमेची सांगता चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ सामुदायिक गो पूजनाने करण्यात आली. परिक्रमेच्या मार्गावर अनेकांनी गो पूजनासह पुष्पवृष्टी केली. जवळपास दोनशेहून अधिक गायींचा या परिक्रमेत समावेश होता.

सृष्टीच्या उत्पत्तीकाळात मनुष्याच्या हितासाठी ईश्वराने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वांची निर्मिती केली. गाय या पाचही तत्त्वांची माता आहे. हिंदू धर्मियांमध्ये दीपावलीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. दीपावलीच्या सणाची सुरुवातच गोवत्स द्वादशीने होते. यादिवशी गोपालक आपल्या गोठ्यातील गोधनाची पूजा करतात, सुवासिनी दिवसभर उपवास ठेवून सायंकाळी गोमातेची वासरासह पूजा करुनच उपवास सोडतात. याशिवाय ज्यांच्याकडे गोधन नाही, असे नागरिकही यादिवशी उपवास ठेवून गोमातेचे पूजन करतात. वेदकाळापासून गाईला मिळालेले हे महत्त्व आजही कायम आहे.

मात्र गेल्या काही वर्षांपासून गोहत्येच्या प्रकारांमध्ये मोठी झाल्याचे दिसून येते. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला संगमनेरातील अशाच बेकायदा गोवंश कत्तलखान्यांवर झालेली कारवाई देखील हेच सांगते. येथील कत्तलखाने बंद व्हावेत व गोवंश जातीच्या जनावरांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी त्यावेळी आंदोलनही झाले होते. या आंदोलनातूनच आजच्या समाजाला गायीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा मानस विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने जाहीर करण्यात आला होता. आजच्या गोवत्स द्वादशीचा मुहूर्तावर त्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

आज (ता.01) सकाळी सात वाजता अकोले नाका येथे सीए कैलास सोमाणी, जीवदया गोरक्षण मंडळाचे विश्वस्त राजेश दोशी व वास्तूविशारद श्रीराम झंवर यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करुन ‘गो ग्राम परिक्रमा’ सुरु करण्यात आली. महात्मा फुले चौक, मेनरोड, सय्यदबाबा चौक, तेलीखुंट, बाजारपेठ, शास्त्री चौक, कॅप्टन लक्ष्मी चौक, रंगारगल्ली मार्गे ही परिक्रमा चंद्रशेखर चौकात पोहोचल्यानंतर परिक्रमेत सहभागी सुमारे दोनशेहून अधिक गोमातांचे सामूहिक पूजन करण्यात आले. सकाळी अकोले नाक्यापासून सुरु झालेल्या या परिक्रमेच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी संगमनेरकरांनी गोपूजनासह गोमातांना सुग्रास खाऊ घातले, अनेक ठिकाणी या परिक्रमेवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या आजच्या पहिल्याच दिवशी संगमनेरातील वातावरण प्रसन्न झाले होते. या उपक्रमासाठी प्रशांत बेल्हेकर, गोपाल राठी, सचिन कानकाटे, कुलदीप ठाकूर, विशाल वाकचौरे, अश्विनीकुमार बेल्हेकर, आकाश राठी, आशिष ओझा, वाल्मीक धात्रक, साहेबराव वलवे, वरद बागुल, अक्षय थोरात, चिराग साहू, प्रतीक पावडे, किशोर गुप्ता, पंकज शिंदे, रवी मंडलिक, मुकेश नरवडे, संदीप वारे, कृष्णा कहार, रोहित परदेशी, करण शिरतार, दगु रुपवते व ललित लोणारी आदिंनी परिश्रम घेतले.

Visits: 4 Today: 1 Total: 30111

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *