भूमिगत गटारांच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ः गायके
भूमिगत गटारांच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ः गायके
नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरातील प्रभाग अकरामधील फेब्रुवारी महिन्यात तयार झालेल्या भूमिगत गटारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे युवा नेते तथा माजी सरपंच सतीश गायके यांनी केली आहे.
नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांना दिलेल्या निवेदनात गायके यांनी म्हंटले की, फेब्रुवारी महिन्यातच शहरातील प्रभाग अकरामध्ये येत असलेल्या चव्हाण वसाहतीच्या भगत भूमिगत गटारींचे काम कोणतेही तंत्र न वापरता ‘हाय रे हुश्शा’ पद्धतीने करण्यात आले. खालवर उतार काढून सांडपाणी जाण्यासाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्याचमुळे गटारी तुंबून त्याचे पाणी बाहेर येऊन रस्त्यावर आले आहे. रस्त्यावर आलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी नगरपंचायतने दर्जेदार कामे संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावी. अन्यथा आपल्या प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही माजी सरपंच सतीश गायके यांनी दिला आहे. सदर निवेदनावर जंगबहादूर पठाण, डॉ.ऋषीकेश माताडे, विकास चव्हाण, यशवंत वाघमारे, मुनीर शेख, भाऊसाहेब कोरेकर, वसंत वाघमारे, चंद्रकांत चव्हाण, संदेश वाघमारे, शुभम व्यवहारे, योगेश गाडेकर, दिवाकर वाघमारे यांच्या सह्या आहेत.