महिलांना न्याय देण्यासाठी ‘गाव तेथे जिजाऊ ब्रिगेड’ अभियान ः भदाणे जिजाऊ ब्रिगेड महिला पदाधिकार्‍यांची संगमनेरातील बैठक उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना काळात उल्लेखनीय काम करणार्‍या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकार्‍यांनी जनतेस आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. आक्रमक असणार्‍या जिजाऊ ब्रिगेडकडे महिला मोठ्या संख्येने आकर्षित होत असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘गाव तेथे जिजाऊ ब्रिगेड’ अभियान सुरू करत आहोत, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी केले आहे.

संगमनेर येथील हॉटेल पंचवटीमध्ये झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आढावा समिती प्रमुख राज्य उपाध्यक्ष के. डी. पाटील, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, विभागीय संघटक प्रमोद आहेरराव, मराठा सेवा संघ मार्गदर्शक चंद्रकांत नवले, अकोले तालुकाध्यक्ष दिलीप शेणकर, डॉ. माणिक शेवाळे, संभाजी ब्रिगेड प्रदेश सचिव डॉ. संदीप कडलग, संघटक सोमनाथ नवले, जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षा डॉ. दीपाली पानसरे, उपजिल्हाध्यक्षा डॉ. श्रद्धा वाणी, जिल्हा कार्याध्यक्षा वृषाली कडलग, तालुकाध्यक्ष माधुरी शेवाळे, तालुका उपाध्यक्षा सुवर्णा खताळ, कार्याध्यक्षा डॉ. नीलम शिंदे उपस्थित होत्या. तत्पूर्वी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप खताळ यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोरोना काळात जिजाऊ ब्रिगेडने उद्योग व्यावसायावर लक्ष केंद्रीत केले असून ‘सुवर्णपंख अ‍ॅपच्या’ माध्यमातून आत्मनिर्भर महिला करण्याचे ध्येय असल्याचे प्रदेशाध्यक्षा भदाणे यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड. सीमा सातपुते, सहसचिव डॉ. वृषाली साबळे, अकोले तालुकाध्यक्षा उज्ज्वला देशमुख, जवळे कडलग शाखाप्रमुख श्रद्धा देशमुख, जिजाऊ ब्रिगेड पोखरी हवेली अध्यक्षा सुचिता घुले, तळेगाव दिघे शाखाप्रमुख डॉ. राजश्री दिघे, संभाजी ब्रिगेड संगमनेर तालुकाध्यक्ष मंजाबापू गुंजाळ, अकोले तालुकाध्यक्ष वैभव गोडसे उपस्थित होते.

विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे आरक्षणावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा यासाठी मराठा सेवा संघ 1991 पासून कार्यरत आहे. अकोला अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अधिवेशनाचे अध्यक्ष स्व. सुधाकरराव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर सन 1996 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना बैठक घेतली होती. मराठा समाजाचे ओबीसीकरण हाच मार्ग आहे. मात्र दिशाहीन व आरक्षणाचा अभ्यास नसणारे लोकप्रतिनिधींमुळेच आरक्षण मिळत नाही. तसेच अभ्यासहीन बेताल वक्तव्य करणारे चमको नेते यांच्या भडक भाषणामुळे समाजा-समाजात कलह निर्माण होत असल्याचे नमूद केले. मराठा आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण हे तिन्ही विषय वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही निकाल एकाच महिन्यात लागल्याने त्याचा संबंध जोडत वेगवेगळ्या समाजात गैरसमज पसरविला जात असल्याचेही स्पष्ट केले. प्रास्ताविक डॉ. दीपाली पानसरे यांनी केले. उपक्रम वृत्तांत डॉ. श्रद्धा वाणी यांनी सादर केला. निवेदन डॉ. वृषाली साबळे व डॉ. नीलम शिंदे यांनी केले तर वृषाली कडलग यांनी आभार मानले.

Visits: 201 Today: 1 Total: 1421602

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *