संगमनेर शहरातील व्यवहार सायंकाळी फक्त पाच वाजेपर्यंतच सुरु राहणार! जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनंतर व्यापारी व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत झाला ‘दिशादर्शक’ निर्णय..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातून कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्याचे दिलासादायक चित्र दिसत असले तरीही संगमनेर तालुक्यातील रुग्णगती मात्र अजूनही भरातच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी संगमनेरात आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत केलेल्या सूचनेनंतर व्यापारी आणि प्रशासनात झालेल्या चर्चेतून संगमनेरातील व्यापार सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरु ठेवावे यावर एकमत झाले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबाजवणी आजपासून सुरु होणार असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दिली.


गेल्या मंगळवारी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले अकोल्याकडे जातांना संगमनेरात थांबले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यासह संगमनेरच्या कोविड स्थितीबाबत आणि पुढील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी एकीकडे जिल्ह्यातील कोविड संक्रमण झपाट्याने कमी होत असतांना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील संक्रमणात मात्र सातत्य असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यातील प्रादुर्भावग्रस्त जिल्ह्यांची पाच श्रेणीत विभागणी करुन त्यानुसार जिल्हानिहाय सवलती जाहीर करण्यात आल्याने सरासरी रुग्णगतीच्या बळावर अहमदनगर जिल्ह्याचा समावेश पहिल्या श्रेणीत झाला, त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व व्यवहार दिवसभर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने या आदेशाच्या विरोधात जावून दुसरा आदेश काढणे अशक्य असल्याची बाब त्यांनी अधिकार्‍यांच्या समोर आणली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती, वाढत असलेला रुग्णदर आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कमी करण्याबाबत व्यापार्‍यांना विश्‍वासात घेवून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या.


त्यानुसार बुधवारी (ता.9) संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसमवेत संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तहसीलदार निकम यांनी जिल्ह्याच्या तुलनेत संगमनेरातील रुग्ण समोर येण्याची गती अधिक असल्याची बाब व्यापार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी दुसर्‍या संक्रमणाच्या सुरुवातीची कारणेही त्यांनी व्यापार्‍यांसमोर मांडून दिवसभराऐवजी ठराविक कालावधी निश्‍चित करुन संगमनेरातील बाजारपेठा उघड्या ठेवण्याबाबत निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून आलेल्या सूचनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संगमनेर शहरातील सर्व व्यवहारांना सकाळपासून सायंकाळी ठराविक वेळेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत एकमत झाले.


त्यानुसार आजपासून (ता.10) संगमनेरातील बाजारपेठ सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविडचे संक्रमण अद्यापही संपलेले नाही, लसीकरणाबाबत अद्याप निश्‍चित धोरण नसल्याने बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी संपूर्ण संगमनेर तालुक्याला पुन्हा लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंधांच्या दरीत लोटणारी ठरु शकते. त्यामुळे व्यापार्‍यांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल तहसीलदार निकम यांनी व्यापारी असोसिएशनसह संगमनेरातील सर्व व्यापार्‍यांचे आभार मानले व कोविड विरोधातील लढ्यात गेल्या पंधरा महिन्यांपासून मिळालेले सहकार्य यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, ओंकारनाथ भंडारी, शिरीष मुळे, प्रकाश कलंत्री, राजेंद्र वाकचौरे या प्रमुख व्यापार्‍यांसह शहर व परिसरातील सर्वच व्यवसायातील व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बुधवारी तहसीलदार अमोल निकम यांच्या दालनात प्रशासन आणि व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होवून गुरुवारपासून (ता.10) संगमनेर शहरातील व्यापारी आस्थापनांसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5 ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. संगमनेरकर नागरिक आणि व्यापारी यांनी कोविड विरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ दिली आहे. या बैठकीत ठरल्यानुसार सर्व व्यापार्‍यांनी व नागरिकांनी वेळेचे बंधन पाळावे असे अपेक्षित आहे.
डॉ.शशीकांत मंगरुळे
प्रांताधिकारी, संगमनेर

जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार स्थानिक व्यापार्‍यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत संगमनेर तालुक्यातील बाजारपेठेत होणारी गर्दी व तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती लक्षात घेता शहरातील व्यापार सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेतच सुरु ठेवण्याबाबत प्रशासन व व्यापार्‍यांचे एकमत झाले आहे. सायंकाळी पाचनंतर केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, उर्वरीत सर्व व्यवहार बंद होतील. नागरिक व व्यापारी वर्गाने या नियमाचे पालन करावे.
डॉ.सचिन बांगर
मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद

Visits: 215 Today: 1 Total: 1416873

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *