कोतूळ पुलाचे काम मे अखेर पूर्ण करणार ः ठाकरे आमदारांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची अधिकार्यांसोबत बैठक

नायक वृत्तसेवा, अकोले
सुमारे 20 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्या मुळा नदीवरील कोतूळ येथील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम 30 मे 2023 अखेर पूर्ण करू असे आश्वासन उर्ध्व प्रवरा कालवा विभाग संगमनेरचे कार्यकारी अभियंता के. एच. ठाकरे यांनी दिले.

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत कोतूळ शुक्रवारी (ता.10) येथे कोतूळ पूल कृती समिती सदस्य, ग्रामस्थ तसेच अधिकार्यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. कोतूळ येथे सुरू असलेल्या पुलाचे काम गेल्या काही दिवसांपासून रेंगाळले आहे. याबाबत ग्रामस्थांनी आमदार लहामटे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून आमदार लहामटेंनी अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक लावली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कंत्राटदाराला सक्त ताकीद दिली. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आठ दिवसांत सर्व यंत्रणा कामाच्या ठिकाणी सतर्क करा. पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन करा. अन्यथा मीच उपोषणाला बसेल असा इशारा देत कामाची मुदत जून 2023 अखेर असली तरी मे 2023 पर्यंत काम पूर्ण करून वाहतूक सुरू करा अशा सूचना दिल्या.

यावेळी कार्यकारी अभियंता के. एच. ठाकरे, उपविभागीय अभियंता ए. के. आंधळे, शाखा अभियंता वाय. एम. खडके, सरपंच भास्कर लोहकरे, पूल कृती समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बबलू देशमुख, ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव, ग्रामस्थ व पूल कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत घाटकर, रवींद्र आरोटे, सचिन गिते, फारुक पठाण, ग्रामपंचायत सदस्य शंकर घोलप, भरत देशमाने, बाळासाहेब देशमुख आदिंनी पुलाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात कुठलीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
