तेल्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी डाळिंब बागांवर चालवताहेत कुर्हाड! आंबीखालसा येथील युवा शेतकरी महेंद्र गगेंनी काढली तीन एकरावरील बाग

महेश पगारे, संगमनेर
हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळख असलेल्या डाळिंबाची गेल्या काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. यातून अनेक प्रयोगशील शेतकर्यांनी भरघोस उत्पादन घेऊन आर्थिक स्तर उंचाविला आहे. परंतु, कोरोना विषाणूसारखीच या पिकावर तेल्याची दूष्ट नजर पडली असून, सहा हजार हेक्टर पेक्षा अधिकच्या क्षेत्रातील डाळिंब बागांना बाधित केले आहे. यामुळे मोठा खर्च करुनही पदरी काहीच पडत नसल्याने वैतागलेल्या डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी झाडांवर कुर्हाड चालविण्यास सुरूवात केली आहे.

डाळिंब हे बहुगुणी फळ असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी असते. माळरान अथवा भुरकट शेतजमिनीसह काळ्या मातीतही त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेंद्री, गणेश, आरक्ता अशा जातींचे भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणून संगमनेर तालुक्यातील हजारो शेतकर्यांनी सुमारे सहा हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केलेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डाळिंबावर तेल्या रोगाने आक्रमण केल्याने उत्पादक मेटाकुटीला आलेले आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा, कमी बाजारभाव, कर्ज तर दुसरीकडे तेल्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकर्यांवर अक्षरशः बागा काढून टाकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथील युवा शेतकरी महेंद्र गगे यांनी सर्व संकटांवर मात करुन तीन एकरावर डाळिंबाची लागवड केली होती. मात्र, वातावरणातील बदल आणि तेल्याची बाधा झाल्याने मोठ्या प्रमाणावर खते-औषधांवर खर्च करुनही पदरी काहीच शिल्लक राहत नसल्याने थेट बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर गेल्या दोन दिवसांपासून वैतागून त्यांनी झाडांवर कुर्हाड चालवली आहे. अशीच परिस्थिती परिसरातील सर्वच डाळिंब उत्पादकांची झाली आहे. त्यामुळे बागाच्या बागा काढून टाकल्या जात असल्याने शेती पुन्हा उजाड होत असल्याचे वास्तव चित्र दिसू लागले आहे.

दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांपासून अधून-मधून पडणारा पाऊस, अतिवृष्टी, वादळ यामुळे बागांवर मोठा खर्च करुनही फूल गळती होते. यावर उपाय करुन कशीतरी फळधारणा झाली की रोगाचा प्रादुर्भाव होतो. सतत असेच घडत आल्याने शेतकर्यांना बागा काढून टाकल्याशिवाय पर्यायच उरत नाहीये. एकतर आधीच कर्जाचा डोंगर असताना पुन्हा बागा वाचविण्यासाठी खर्च करुनही काहीच मिळाले नाही तर बोजा वाढतच राहील; या विवंचनेत शेतकरी सापडले असून, कोरोनासारखाच हा तेल्या कधी हद्दपार होईल, अशा अपेक्षेवर शेतकरी राहिलेला आहे.

साधारण तीन एकरावरील डाळिंब बागेला तेल्या रोगाचा नायनाट करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च केला. जैविक व रायायनिक औषधांची फवारणी करुन आटोक्यात येतो. मात्र, तरी देखील हा रोग हटला नसल्याने दुर्दैवाने बागच काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तीनशे रुपये रोजाने मजूर देखील घेतले आहे.
– महेंद्र गगे (डाळिंब उत्पादक, आंबीखालसा)

ज्या बागेत आम्ही काम करुन रोजगार मिळाला. तीच बाग आम्हांला काढावी लागत असल्याचे वाईट वाटते. याची मजुरी देखील मिळणार आहे, परंतु पुढे परत काम मिळणार नसल्याचे दुःख आहे.
– बाळासाहेब जाधव (मजूर)

