नेवासा तालुक्यातील अवैध धंदे बंद करा! भारतीय लहुजी सेनेचे उपोषण दुसर्या दिवशीही सुरू..

नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा तालुक्यात अवैध मटका, दारुअड्डे, सोरट, जुगार असे अवैध धंदे सुरू असून या व्यवसायामुळे हजारोंचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. गल्लीबोळात चाललेले हे व्यवसाय बंद करण्यात येऊन अवैध धंदे चालकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्यावतीने सोमवारपासून (ता.20) तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे असून मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. मात्र, पोलिसांनी अद्यापही दखल घेतली नाही.

या उपोषणाचे नेतृत्व भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व सचिव हनीफ पठाण हे करत असून या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांनी पाठिंबा देऊन उपोषणामध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच लहुजी सेनेचे जिल्हा संघटक राजेंद्र त्रिभुवन, ज्येष्ठ पत्रकार रमेश राजगिरे, लहुजी सेनेच्या महिला आघाडी प्रमुख मंगल चव्हाण, ज्योती भोसले, राणी भोसले, अनिता भोसले, बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष गणपत मोरे, तिरमली समाजाचे युवा नेते राम शिंदे यांनी सहभाग नोंदवला आहे.

याबाबत भारतीय लहुजी सेनेच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा तालुक्यात सुरू असलेला मटका, गावठी दारु, सोरट, जुगार याच्या आहारी शालेय विद्यार्थी व तरुण जात असून हजारो गोरगरीब लोकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका सुरू असून त्यातल्या त्यात तालुक्यातील प्रवरासंगम हे या मटका चालकांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. याठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावर मटका पेढ्या चालविल्या जात असून आर्थिक हितसंबंधामुळे पोलीस अधिकार्यांकडून एकाही मटका चालकांवर तसेच दारुअड्डयासह सोरट, जुगार चालविणार्यांवर छापा मारुन त्यांना ताब्यात घेतले जात नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. आजपर्यंत अनेक संघटनांनी याप्रकरणी आवाज उठविलेला आहे. उपोषणे, आंदोलने केलेली आहे. असे करुन काही दिवस अवैध मटका, दारुअड्डे, सोरट, जुगार बंद केले जातात. परंतु काही कालावधीनंतर पूर्वीप्रमाणेच जोमाने हे अवैध धंदे पुन्हा अधिकार्यांच्या आशीर्वादाने सुरु होतात असा आरोप केला आहे.
