साईमंदिरावर अवलंबून असणार्यांचा रोजीरोजीचा प्रश्न बिकट
साईमंदिरावर अवलंबून असणार्यांचा रोजीरोजीचा प्रश्न बिकट
नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व मंदिरे अद्यापही बंद आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेले व्यवसायही बंद असल्याने कर्मचार्यांसह दुकानदारांचा रोजीरोटीचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. तर विश्वस्त मंडळाची आर्थिक घडीही विस्कटली आहे. असे चित्र अहमदनगर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीमध्ये पहावयास मिळत आहे.
दरमहा शेकडो कोटींची उलाढाल करणार्या साईनगरीच्या अर्थकारणाचे चाक पुरते रूतले आहे. हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून दीड-दोन लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत. साईनगरीत लहान-मोठे साडेसातशे लॉजिंग-हॉटेल्स, दोनशे ट्रॅव्हल्स व्यावसायिक, अडीचशे खासगी बसेस, पाचशेवर हार-फुले, लॉकेट व मूर्तीची दुकाने, एक हजाराहून अधिक खासगी जीप-कार वाहतूकदार, शेकडो फूल विक्रेते व फूल उत्पादक शेतकरी मंदिरावरच अवलंबून आहेत. मात्र मंदीर बंद असल्याने यांचे दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. याचा परिणाम अक्षरशः त्यांना उपजीविका करणेही मुश्किल झाले आहे. तर गेल्या पुण्यतिथी उत्सवात 4 कोटी देणगी मिळाली ती यंदा केवळ 38 लाखांवर आली आहे.