नियमित योगासने करणे हा निरोगी जीवनाचा पाया ः जाखडी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नियमित योगासने व प्राणायाम करणे हा निरोगी जीवनाचा पाया आहे. आपल्या प्राचिन ऋषी मुनींनी सखोल अभ्यास व संशोधन करून हजारो वर्षांपासून मानवजातीला दिलेले वरदान म्हणजे अष्टांग योग आहेत. प्रत्येकाने आपले जीवन योगमय केल्यास आरोग्याच्या समस्यांना पायबंद घालणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

संगमनेरमधील पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ज्ञानेश्वर मंदिराच्या सभागृहात प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विविध योगासने सादर केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी शीर्षासनासह अनेक अवघड आसने सादर करून ती कशी केली पाहिजेत याचे मार्गदर्शन सदस्यांना केले. नियमितपणे योगासने करण्यामुळे होणारे लाभ समजावून सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संदीप वैद्य, सतीश देशपांडे, बापू दाणी, अरुण कुलकर्णी, प्राचार्य सुधाकर क्षीरसागर, राजू क्षीरसागर, उमेश जोशी, 90 वर्षीय मराठे काका, कुमार गंधे, नीलेश पुराणिक आदी उपस्थित होते.
