स्वयंभू दत्त महाराजांच्या दर्शनासाठी लोटला जनसागर! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभच्या जयघोषाने अकलापूर दुमदुमले
नायक वृत्तसेवा, घारगाव
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या अकलापूर (ता. संगमनेर) येथे बुधवारी दत्त जयंती उत्सवानिमित्त भाविकांनी स्वयंभू दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कीर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे यांच्या कीर्तनाने हा सोहळा अधिक भक्तीमय झाला.
अकलापूर येथे श्री दत्तात्रय महाराजांचे जागृत देवस्थान असून गुरूपौर्णिमा आणि दत्त जयंतीसाठी महाराष्ट्रभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. बुधवारी दत्त जयंतीनिमित्ताने हजारो भाविकांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतले असून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्याचबरोबर देवस्थान परिसरात खाऊ, खेळणी व प्रसादाची विविध दुकानेही थाटली होती. देवस्थानकडून सर्व भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.
आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ति साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, मारूती मेंगाळ, राजहंस दूध संघाचे संचालक बबन कुर्हाडे, सुनीता भागरे, व्यापारी दिलीप आहेर यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री क्षेत्र आकलापूरला हजेरी लावत दर्शन घेतले. भाविकांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त शिवाजी तळेकर यांनी दिली. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भैय्ये सर आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ यांनीही भाविकांचे आभार मानले.
यावेळी देवस्थानच्यावतीने अन्नदात्यांना श्री दत्त महाराजांचे चांदीचे नाणे देऊन त्यांचा सत्कारही देवस्थानचे विश्वस्त संपत आभाळे यांच्यासह आदिंच्या हस्ते करण्यात आला. मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, संगमनेर, अकोले, जुन्नर तसेच विविध भागातून आलेल्या भाविकांनी स्वयंभू दत्तात्रय महाराजांचे दर्शन घेतले. अगदी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे चार वाजता महाअभिषेक, होम हवन, महाआरती, महाप्रसाद आणि रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम पार पडले. हा दत्त जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तात्रय देवस्थान ट्रस्टसह ग्रामस्थ, युवक व महिलांनी विशेष परिश्रम घेतले.