कासलीतील ट्रॅक्टर मालकाचा खून; मृतदेह जंगलात फेकला

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील कासली येथील ट्रॅक्टर मालकाचा कुर्‍हाडीचा घाव घालून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह नाशिक जिल्ह्यातील जंगलात फेकून दिल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, महेश सोन्याबापू मलिक (रा.कासली, ता.कोपरगाव) याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून पढेगाव येथील चेतन आसने काम करत होता. त्यानिमित्ताने आसने याचे मयताच्या घरी नेहमी ये-जा होती. त्यातून मयताची पत्नी व चालक आसने याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून दोघांचा बेबनाव निर्माण झाला होता. त्या घटनेनंतर चालक आसने हा नाशिककडे पसार झाला होता. चेतन घरी आला असल्याची खबर मिळाल्यानंतर जाब विचारण्यासाठी मालक महेश मलिक चेतनच्या घरी गेला. त्यांच्यात तेथे बाचाबाची होऊन चेतन बापू आसने व त्याचा भाऊ केशव बापू आसने यांनी कुर्‍हाडीचा घाव घालून महेश मलिक याचा खून केला.


या घटनेनंतर आरोपींनी पिकअपमधून मृतदेह त्र्यंबकच्या पुढे असलेल्या म्हसरुळच्या जंगलात फेकून दिला. या घटनेनंतर मयत तरुणाच्या आई सुनीता सोन्याबापू मलिक यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी भा.दं.वि.कलम 364, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेऊन रात्री अटक केली आहे. पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी मृतदेह म्हसरुळच्या जंगलात टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी जंगलात जावून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करत आहे.

Visits: 100 Today: 1 Total: 1115754

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *