रांजणगाव खुर्दमध्ये अपहरण करुन तरुणास बेदम मारहाण राहाता पोलिसांत सहा-सात जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील रांजणगाव खुर्द शिवारात एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर उसाच्या शेतात घेऊन जात जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत सहा-सात जणांवर अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
रवींद्र अशोक लोंढे असे जखमी तरुणाचे नाव असून मारहाणीत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिसांनी तातडीने रांजणगाव परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींना चाहूल लागताच त्यांनी रवींद्र लोंढेला दुसरीकडे नेले. त्यानंतर आरोपींनी त्याला लाकडी दांडा आणि धारदार शस्रांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारून टाकू, अशी धमकी देत शहरातील पाटील हॉस्पिटलसमोर टाकून दिले. शुक्रवारी सकाळी कुटुंबीय जखमी रवींद्र लोंढे याला घेऊन फिर्याद देण्यासाठी राहाता पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी घटनेची माहिती मिळताच परिसरातील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
राहाता ते चितळी रस्त्यावरील एकल शिवारात अमोल माधव मासाळ यांच्या यशराज हॉटेलवर सहा महिन्यांपासून वेटर म्हणून मी काम करतो. या हॉटेलवर रांजणगाव येथील पप्पू उर्फ सुनील बाळासाहेब गाढवे हा त्याच्या मित्रांसोबत जेवणासाठी नेहमीच येत असतो. गावातील असल्याने त्याला ओळखतो. 30 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मी व हॉटेल मालक अमोल मासाळ असे आम्ही दोघे हॉटेलमध्ये असताना पप्पू उर्फ सुनील गाढवे हा हॉटेलमध्ये आला व पाण्याची बाटली घेवून हॉटेलमध्ये पाणी पिला. त्यानंतर मालक अमोल मासाळ व मी त्यास म्हणालो की, तुझ्याकडे हॉटेलची 10 हजार रुपये उधारी झाली आहे. तेवढी उधारी आम्हांला देवून टाका. तेव्हा तो म्हणाला की, मी काय पळून चाललो का, माझ्याकडे येईल त्यावेळेस देईल. हॉटेलजवळील शेतात लघवीसाठी गेला. तेथे दत्तात्रय रंगनाथ गाढवे यांनी शेतात महिला काम करत आहे येथे लघवी करू नका असे म्हणताच त्याने दत्तात्रय गाढवे यांच्याशी भांडण करू लागला. त्यामुळे मी व अमोल मासाळ असे दोघे तेथे गेलो आणि सोडवासोडव केली.
मात्र, त्यानंतर गाढवे हा त्याठिकाणाहून निघून जाताना म्हणाला, लय भांडण सोडविणारा झाला का? पुन्हा सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गाढवे व त्याचे साथीदार हॉटेलमध्ये आले आणि मला त्यांनी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या दत्तू चव्हाण यांच्या उसाच्या शेतात ओढत घेवून गेले. त्यावेळी अमोल मासाळ म्हणाला की, तुम्ही असे काय करता. त्यावेळेस पप्पू गाढवे त्यास म्हणाला की, तु तुझे काम कर तुला काय करायचे असे म्हणून त्याने त्याला तेथील एक दगड उचलून फेकून मारला. त्यांनी मला उसात नेल्यानंतर त्याठिकाणी माझ्या ओळखीचे शंभू सारंगधर मोटकर, नवनाथ उर्फ सोमनाथ सदाशिव साबारे हेही तेथे आले. त्या सर्वांनी एकत्रित आल्यानंतर लाकडी दांडा व लोखडी कत्तीने वार करून जखमी केले. आणि जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे जखमी रवींद्र लोंढे याने फिर्यादीत म्हटलेले आहे.
यावरून पोलिसांनी पप्पू उर्फ सुनील बाळासाहेब गाढवे, अमोल वेणूनाथ मासाळ, अशोक दिलीप गाढवे (सर्व रा.रांजणगाव खुर्द), आकाश मनोज पाडांगळे (रा.चोळकेवाडी), शंभू सारंगधर मोटकर (रा.पुणतांबा), नवनाथ उर्फ सोमनाथ सदाशिव सांबारे (रा.रामपूरवाडी) यांच्या विरोधात भादंवि कलम 326, 323, 143, 147, 148, 504, 506 व अॅट्रॉसिटी अॅक्ट 3 (1) (ठ) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.