यंदाच्या विजयादशमी सोहळ्यावर कोविडचे सावट..! मालपाणी उद्योग समूहात साजरा होणारा यंदाचा सोहळा रद्द..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शतकांहून मोठी परंपरा असलेल्या येथील सिमोल्लंघनावर कोविडचे सावट असल्याने यंदाचा हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी मालपाणी उद्योग समूहाच्या अकोले रोडवरील कारखान्यात विजयदशमीच्या निमित्ताने संगमनेरकर मोठी गर्दी करीत असतात. आकर्षक विद्युत रोषणाईने उजाळण्यात येणार्या या परिसरातील शमीवृक्षाचे पूजन करण्याची संगमनेरकरांची पूर्वापारची परंपरा आहे, आजवर या परंपरेत कधीही खंड पडल्याचे ऐकिवात नाही. यावर्षी मात्र सार्वजनिक उत्सवांवर व गर्दी करण्यावर मर्यादा असल्याने प्रशासनाच्या सूचनेवरुन यावर्षीचा सिमोल्लंघन व रावण दहन सोहळा रद्द करावा लागल्याची माहिती मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी दिली.

अकोले रस्त्यावर मालपाणी उद्योग समूहाचा पॅकींग कारखाना आहे. याच परिसरात प्राचीन शमीवृक्ष असून दरवर्षी विजयादशमीला हजारों संगमनेरकर नागरिक तेथे जावून शमीचे पूजन करतात. त्यासाठी मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने हा संपूर्ण परिसर आकर्षक सजवण्यात येतो, वृक्षवेलींवर रंगीबेरंगी विद्युतमाळा सोडल्या जातात, विविध देवीदेवतांच्या प्रतिमा उभारुन त्यावर प्रकाश झोत टाकून अल्हाददायक वातावरणाची निर्मिती केली जाते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून विजयादशमीच्या निमित्ताने येथे सत्यनारायण महापूजा केली जाते. त्यासोबतच गेल्या काही वर्षांपासून या कारखान्याच्या समोरील बाजूस असलेल्या शिवशक्ति ट्रान्सपोर्टच्या आवारात रावण दहनाचा कार्यक्रम व त्यानंतर मोठ्या पडद्यावर श्रीराम-रावण युद्धानंतर अयोध्येत परतणार्या श्रीरामचंद्रांचा रामायणातील प्रसंग पाहण्याचीही व्यवस्था असते. हजारों संगमनेरकर त्याचा आनंद घेत असतात.

यावर्षी मात्र संपूर्ण जगावर कोविडचे सावट आहे. कोविड संसर्गाचा वेग कमी झाला असला तरीही धोका मात्र कायम असल्याने अजूनही सार्वजनिक उत्सवांसह गर्दीच्या कार्यक्रमांना मनाई आहे. संगमनेरच्या सिमोल्लंघन सोहळ्यातही हजारों संगमनेरकर उत्साहाने सहभागी होत असतात. त्यातून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार यंदाचा विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. संगमनेरकरांनी विजयादशमीच्या दिवशी घरातच राहुन कोविडच्या पराभवासाठी सुरु असलेल्या अंतिम प्रयत्नांना पाठबळ द्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.

मालपाणी उद्योग समूहाच्या कारखाना आवारातील शमीवृक्षाचे पूजन करुन सिमोल्लंघन करण्याची संगमनेरकरांची जूनी परंपरा आहे. या पंरपरेत यंदा मात्र इतिहासात बहुधा पहिल्यांदाच खंड पडणार आहे. काही जून्या जाणत्यांच्या माहितीनुसार शंभर वर्षांपूर्वी राज्यात प्लेगची साथ आली होती, तेव्हाही हा सोहळा रद्द झाला नव्हता. यावेळची परिस्थिती मात्र खुप वेगळी असल्याने नाईलाजाने यंदाचा हा पारंपारिक सोहळा रद्द करण्यात आला आहे.

