रुद्रवीणेच्या तारांमधून निघालेल्या सुमधूर रागाने श्रोते मंत्रमुग्ध! शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा समारोप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरु आणि शिष्य यांना वेगळे बघण्याची मानवी वृत्ती असली तरीही प्रत्यक्षात ते वेगळे नसून एकच आहेत. आपल्याकडील गुरु-शिष्य परंपरा अतिशय प्राचीन असून समाजरचनेत अत्यंत महत्त्वाची आहे. यातील एक देणारा आणि दुसरा घेणारा असतो. ज्यावेळी या दोघांची भेट होते तेव्हा त्यांच्यात होणारा संवाद परंपरेशी जोडलेला असतो. या दोघांमधून प्रवाहित होणार्‍या विचारधारेला काही नियमही असतात. गुरुने शिष्याला ज्ञान दिल्यानंतर शिष्याने स्वसाधनेतून नवनिर्मिती करुन त्यात भर घालणे अभिप्रेत असल्याचे प्रतिपादन ध्रुपद गायकीतील डागर घराण्याची परंपरा वाहणार्‍या उस्ताद मोही बहाउद्दीन डागर यांनी केले.

कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे सातव्या दिवसाचे अखेरचे पुष्प गुंफतांना ते ‘संगीतातील गुरु आणि शिष्य परंपरा’ या विषयावर बोलत होते. यावेळी कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे, खजिनदार ओमप्रकाश आसावा आदी मंचावर उपस्थित होते.

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी आपली माता प्रमिला डागर यांच्याकडून सतार वादनाचे धडे घेणार्‍या मोही बहाउद्दीन यांनी तीन वर्षांच्या प्रारंभिक प्रशिक्षणानंतर आपल्या वडिलांकडून रुद्रवीणा वादनाची ओळख करुन घेतली. त्यानंतरच्या कालावधीत त्यांनी प्रख्यात रुद्रवीणा वादक उस्ताद झियाउद्दीन डागर व त्यांचे काका उस्ताद झिया फरीउद्दीन डागर यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी संगीताची पहिली मैफील सादर करीत संगीत क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्‍या उस्ताद मोही बाहाउद्दिन यांनी आजवर देश-विदेशात शेकडो संगीत मैफिलींचे आयोजन करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

शेवटच्या दिवसाचे पुष्प संगीतातून गुंफणार्‍या उस्ताद मोही बहाउद्दीन यांनी यावेळी रुद्रवीणेची तार छेडताच कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा परिसर संगीतमय झाला. ध्रुपद शैलीतील राग मारवाची नजाकत सादर करताना रुद्रवीणेच्या आवाजातील चढ-उतार आणि वैराग्याचा भाव जागवणार्‍या राग मारवाने उपस्थित श्रोत्यांना जागेवरच डोलायला भाग पाडले. कार्यक्रमाच्या अखेरच्या चरणात पखवाज आणि तानपुर्‍याच्या साथीने त्यांनी सादर केलेली जुगलबंदी कवी अनंत फंदी व्याख्यानमालेला शिखरावर घेवून जाणारी ठरली. ओमप्रकाश आसावा यांनी सूत्रसंचालन केले, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी यांनी आभार मानले.

Visits: 133 Today: 2 Total: 1105104

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *