संगमनेर तालुक्यातील ‘कोविड शून्य’ गावांच्या संख्येत पुन्हा वाढ! अवघ्या दोनच गावांत दुहेरी संख्येत सक्रीय रुग्ण; आजही रुग्णसंख्येचा मोठा दिलासा कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याला मिळत असलेल्या दिलाशामुळे रुग्णसंख्येचा सरासरी वेग झपाट्याने खाली आला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात कोविड रुग्णसंख्येच्या बाबतीत उंचावलेली तालुक्यातील गावांची संख्या आता पुन्हा एकदा खालावत चालली असून शून्य रुग्ण असलेल्या गावांची संख्याही आता 106 झाली आहे. विशेष म्हणजे उर्वरीत 69 गावांपैकी तब्बल 61 गावांमध्ये पाचपेक्षा कमी रुग्ण आहेत तर दहा पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांची संख्या केवळ दोन आहे. सध्या तालुक्यातील 243 जणांवर उपचार सुरु असून आज शहरातील चौघांसह अवघ्या 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आता 22 हजार 913 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.


जूनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील उंचावलेल्या रुग्णसंख्येला मोठा उतार मिळाल्याने गेल्या दोन महिन्यात बिघडलेली जिल्ह्याची आरोग्य स्थिती आजच्या परिस्थितीत पूर्णतः नियंत्रणात आली आहे. जूनच्या पहिल्या चौदा दिवसांत जिल्ह्यात सरासरी रुग्णवाढीचा दर 776 रुग्ण दररोज इतका होता. तर नंतर पंधरा दिवसांत त्यात मोठी घट झाल्याचे समोर आले. मागील चौदा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्याचा सरासरी रुग्णवाढीचा दर पाचशेच्या खाली आला असून सध्या रुग्णवाढीचा वेग 433 रुग्ण असा आहे. जूनच्या आत्तापर्यंच्या कालावधीत जिल्ह्यातून सरासरी 599 रुग्ण दररोज या गतीने 17 हजार 365 रुग्णांची वाढ झाली आहे.

संगमनेर तालुक्याच्या कोविड स्थितीतही गेल्या पंधरा दिवसांत मोठा बदल झाला आहे. तालुक्यात जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरी रुग्णगती 69 रुग्ण प्रतीदिवस होती, त्यात आता मोठा बदल झाला असून गेल्या दोन आठवड्यात हाच वेग आता 33 रुग्ण दररोज या गतीवर आला आहे. जूनच्या आत्तापर्यंतच्या कालावधीत तालुक्यातून सरासरी 50 रुग्ण या गतीने 1 हजार 459 रुग्ण समोर आले असून गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये याच गतीने तालुक्यातून 1 हजार 529 रुग्ण समोर आले होते.

महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव व नेवासा या तालुक्यातील संक्रमणाचा सरासरी वेग टिकून राहील्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या उताराला लागलेली असतांनाही निम्म्या जिल्ह्याची अवस्था मात्र चिंताजनकच होती. गेल्या आठ दिवसांत मात्र त्यातही मोठा बदल झाला असून 20 जूननंतर जिल्ह्यातील एकाही तालुक्यात तीन आकडी रुग्ण आढळलेले नाहीत. संक्रमणात होत असलेल्या घसरणीमुळे संगमनेर तालुक्यातील कोविड रुग्णसंख्या शून्य होणार्‍या गावांमध्येही पुन्हा भर पडू लागली असून संक्रमित झालेल्या संगमनेर तालुक्यातील 175 गावांपैकी 106 गावे आता शून्य रुग्णसंख्येची झाली आहेत. एकच सक्रीय रुग्ण असलेल्या गावांची संख्या 28, तर दोन ते पाच या दरम्यान रुग्ण असलेल्या गावांची संख्या 33 आहे. दोन गावांमध्ये प्रत्येकी सहा तर तीन गावांमध्ये प्रत्येकी आठ रुग्ण आहेत. संगमनेर शहरातील 52 तर घुलेवाडीतील 23 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यासह तालुक्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आजही संक्रमण कायम असून संगमनेर तालुक्यातून आज अवघे 20 रुग्ण समोर आले आहेत. त्यात शहरातील भारतनगर येथील 43 वर्षीय तरुण, जनता नगरमधील 48 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 42 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुणाला संक्रमण झाले आहे. याशिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागातील बारा गावांमधून सोळा रुग्ण समोर आले आहेत. त्यात झोळे येथील 25 वर्षीय तरुण, कासारे येथील 38 वर्षीय महिला, साकूर येथील 60 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 23 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 60 वर्षीय महिलेसह 39 वर्षीय तरुण, पारेगाव खुर्दमधील 50 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम, कोंची येथील 22 वर्षीय तरुणी, आश्वी बु. येथील 28 वर्षीय तरुण, कातरवाडीतील चार वर्षीय बालिका, पानोडी येथील 55 वर्षीय इसम, उंबरी बाळापूर येथील 49 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण आणि माळेगाव येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ नोंदविली गेली असून पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून साठपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेचे 36, खासगी प्रयोगशाळेचे 162 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या 213 निष्कर्षातून जिल्ह्यातील 411 जणांना कोविडची बाधा झाली आहे. त्यात पारनेर 63, श्रीगोंदा 61, शेवगाव 33, पाथर्डी व राहुरी प्रत्येकी 29, अकोले व कर्जत प्रत्येकी 25, श्रीरामपूर 23, संगमनेर 20, जामखेड, नेवासा व राहाता प्रत्येकी 19, नगर ग्रामीण 17, कोपरगाव 13, अहमदनगर महापालिका क्षेत्र आठइतर जिल्ह्यातील सात व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्हा आता 2 लाख 79 हजार 500 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

Visits: 30 Today: 2 Total: 118911

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *