स्वातंत्र्याच्या पंच्च्याहत्तरीनंतर पेमरेवाडीत होणार स्मशानभूमी! जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्याकडून निधी उपलब्ध

नायक वृत्तसेवा, घारगाव
स्वातंत्र्याच्या पंच्च्याहत्तरीनंतर पहिल्यांदाच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी गावाअंतर्गत असलेल्या पेमरेवाडी येथे जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या निधीतून स्मशानभूमीचे काम होणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी (ता.29) सकाळी पार पडला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बोटा गटात फटांगरे यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून अद्यापही येथे स्मशानभूमी नाही. त्यामुळे गावापासून काही अंतरावर असलेल्या एका ठिकाणी अंत्यविधी व दशक्रियाविधीचा कार्यक्रम होत असतो. काही दिवसांपूर्वी अंत्यसंस्काराच्या वेळी पाऊस होता. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी कुचंबना झाली होती. अशी वेळ येवू नये म्हणून स्मशानभूमी झाली पाहिजे. त्यासाठी भोजदरी गावच्या सरपंच शिल्पा पोखरकर, उपसरपंच बंडू शिंदे, आदिनाथ पोखरकर, नीलेश पोखरकर, आनंद पोखरकर, रोहिदास पोखरकर, ज्ञानदेव डोंगरे, संजय डोंगरे आदिंनी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांची भेट घेवून त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनीही लगेच स्मशानभूमीच्या कामासाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

रविवारी सकाळी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, बोरबन गावचे माजी सरपंच ज्ञानदेव गडगे, काबूपाटील वाकळे, अकलापूरचे माजी उपसरपंच संपत आभाळे, विकास हांडे आदी मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तर या स्मशानभूमीसाठी आंबीदुमाला गावचे रामदास शंकर नरवडे यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. स्वातंत्र्याच्या पंच्च्याहत्तरीनंतर पेमरेवाडीत स्मशानभूमी होणार असल्याने ग्रामस्थांनी फटांगरे यांचे आभार मानले आहे.

जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेतीन कोटी रुपयांचा डांबरी रस्ता, तीस लाख रुपयांचा पेमरेवाडी रस्ता, चौदा लाख रुपयांचे नवीन ग्रामपंचायत कार्यालय, पेमरेवाडी येथे स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच बाळंद्री याठिकाणीही स्मशानभूमीचे काम चालू होणार आहे.
– गौरव डोंगरे (तालुकाध्यक्ष-विद्यार्थी काँग्रेस संगमनेर)
