ग्रामीण बसफेर्‍या पूर्ववत करण्यासाठी छात्रभारतीचे आंदोलन!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षणाची पंढरी समजल्या जाणार्‍या संगमनेरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. टाळेबंदीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने बंद केलेल्या ग्रामीण बसफेर्‍या अद्यापही सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अखेर छात्रभारतीने पुढाकार घेत आज संगमनेर आगारातील बस रोखल्या. मात्र पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शिष्टाई केल्याने विद्यार्थ्यांनी चर्चेचा मार्ग अवलंबित बसस्थानकाचे प्रवेशद्वार खुले केले. विद्यार्थ्यांची निकड वरीष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन यावेळी आगारप्रमुख नीलेश करंजकर यांनी दिले.

टाळेबंदीच्या काळात अर्थचक्रासोबतच शैक्षणिक चक्रही ऑनलाईन झाल्याने शिक्षण संस्थांना टाळे लागले होते. कोविडचे संकट जशा पद्धतीने मागे सरले तशा पद्धतीने शिक्षण संस्था खुल्या करण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला. त्यानुसार संगमनेरातील महाविद्यालये आणि नववीपासूनच्या शाळा यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. संगमनेरातील बहुतांशी शिक्षण संस्थांमध्ये ग्रामीणभागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस हा एकमेव पर्याय आहे.

मात्र टाळेबंदी उठल्यानंतर व शालेय संस्था सुरू होऊनही परिवहन महामंडळाने बंद केलेल्या ग्रामीण बसफेर्‍या अद्यापही सुरू केल्या नसल्याने ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या गंभीर विषयाचा धागा पकडून विद्यार्थ्यांचे संघटन असलेल्या छात्रभारतीने गेल्या 23 जानेवारी रोजी संगमनेरच्या आगार प्रमुखांना निवेदन देऊन ग्रामीणभागातील बससेवा पूर्ववत करण्याबाबत मागणी केली होती व तसे न घडल्यास 28 जानेवारी रोजी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानुसार गेल्या पाच दिवसांत आगार प्रमुखांनी कोणतीही कारवाई न केल्याने आज (ता.28) सकाळी छात्रभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले यांच्या नेतृत्त्वाखाली गौरी राऊत, ऋषी वाकचौरे, तृप्ती जोर्वेकर, राहुल जर्‍हाड, तुषार पानसरे, दीपाली कदरे, सोमनाथ फापाळे, शीतल रोकडे या विद्यार्थ्यांनी संगमनेर बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार रोखले.

याबाबतची माहिती मिळताच संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आंदोलनस्थळी धाव घेत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संगमनेर बसआगाराचे प्रभारी प्रमुख नीलेश करंजकर यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करुन वरीष्ठांना कळविली जाईल व लवकरच या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन यावेळी आगार प्रमुखांनी दिल्याने या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

Visits: 3 Today: 1 Total: 30564

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *