टोलवसुली सुरु असूनही ‘नाशिक-पुणे’ महामार्गाची चाळण! देखभालीकडे दुर्लक्ष करुन ठेकेदाराकडून चक्क खड्ड्यात माती भरण्याचे काम..
नायक वृत्तसेवा, घारगाव
चार वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला ‘पुणे-नाशिक’ महामार्ग सुरुवातीपासूनच विविध कारणांनी चर्चेत राहीला आहे. अवघ्या चार वर्षातच या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम अपघातांची संख्या वाढण्यात झाला असून सध्या पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये जमा होत असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होण्यासह प्रवाशांना दुखापतीही होत आहेत. या महामार्गावरुन दररोज सुमारे चौदा हजार वाहनांचा प्रवास होतो व दिवसाकाठी त्यांच्याकडून सुमारे सोळा लाख रुपयांची टोल वसुली केली जाते. मात्र जबाबदारी असतांनाही ठेकेदार कंपनीकडून या महामार्गाच्या देखभाल व दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांचाही संताप खद्खद्त आहे.
जुन्या महामार्गाची वाहनधारण क्षमता कमी असल्याने पुणे-नाशिक महामार्ग प्रवाशांना नकोसा झाला होता. वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची मोठी संख्या यामुळे या दोन महानगरांदरम्यान प्रवास करण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत. त्यामुळे या महामार्गाच्या विस्तारीकरणाची मागणी नेहमीच होत होती. त्यावर उपाय म्हणून पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्या या मुख्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आय.एल.एफ.एस. या कंपनीने महामार्गाची निविदा घेवून 2013 साली प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. या कामासाठी मुख्य ठेकेदार असलेल्या आय.एल.एफ.एस. कंपनीने खेड ते झोळे पर्यंतचा रस्ता मॉन्टोकार्लो या कंपनीकडून तर झोळे ते सिन्नर हा रस्ता जी.एच.व्ही.इंडिया प्रा.लि. या कंपनीकडून तयार करुन घेतला.
जवळपास चार वर्षे या रस्त्याचे काम सुरु होते. 7 फेब्रुवारी, 2017 रोजी खेड ते सिन्नर दरम्यानच्या महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यासह संबंधित ठेकेदार कंपनीला टोल वसुली करण्याची परवानगी देण्यात आली. रस्त्याच्या कामकाजाचा ठेका घेतलेल्या आय.एल.एफ.एस. कंपनीने दोन भागात या रस्त्याचे काम मात्र अन्य दोन कंपन्यांकडून करवून घेतले आणि टोल सुरु करण्याची परवानगी मिळताच स्वतःची यंत्रणा उभी करुन सिन्नर, झोळे व चालकवाडी (खेड) या तीन ठिकाणच्या टोलनाक्यांवरुन वाहनचालकांकडून वसुलीही सुरु केली.
यादरम्यान राहिलेल्या 30 टक्के कामांसह या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी साहजिकच कंपनीची होती. मात्र गेल्या चार वर्षात या कंपनीने केवळ टोल वसुलीशिवाय दुसरे काहीच केले नाही. विशेष म्हणजे शिल्लक राहिलेल्या 30 टक्के कामातील बहुतेक काम आजही तसेच असल्याने या महामार्गावर गेल्या चार वर्षात शेकडो अपघात झाले व त्यातून अनेक निष्पापांना आपले जीव गमवावे लागले. मात्र त्याचा कोणताही परिणाम ठेकदार असलेल्या आय.एल.एफ.एस. कंपनीवर आजवर झालेला नाही.
सध्या पुणे ते नाशिक या महामार्गावर संगमनेर तालुक्यातील कर्हे ते बोटा खिंड या जवळपास 50 किलोमीटरच्या अंतरात जागोजागी असंख्य खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अपघातांची श्रृंखला सुरु असून दररोज या रस्त्यावर कोठे ना कोठे अपघात होत आहेत. त्यातच आता पावसाळा सुरु असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचते, त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने त्यात वाहने आदळून वाहनांच्या नुकसानीसह प्रवाशांनाही दुखापती होत आहेत. त्यासोबतच या महामार्गाच्या मधोमध व दुहेरी लावण्यात आलेले दिवेही (स्ट्रीट लाईट) गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने आय.एल.एफ.एस. ही ठेकेदार कंपनी वाहनचालकांकडून केवळ टोल वसुली करीत असून रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे मात्र साफ दुर्लक्ष करीत आहे.
विशेष म्हणजे प्रवाशांच्या वाढत्या तक्रारनंतर टोल नाक्यावरील कर्मचार्यांनी संपूर्ण महामार्गावर जागोजागी रस्त्याच्या बाजूची माती गोळा करुन त्यातून खड्डे भरण्यास सुरुवात केली असून त्यामुळे महामार्गावर आता चिखलाचेही साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारा प्रत्येक प्रवाशी ठेकेदाराच्या नावाने बोटं मोडीत असून स्थानिकांनी रस्त्यावरील दिवे सुरु करण्याचीही मागणी केली आहे.
अपूर्ण कामे आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन खेड तालुक्यातील चालकवाडी येथे असलेला टोलनाका तेथील आमदारांनी अगदी सुरुवातीलाच बंद पाडला होता, आजही तो बंद अवस्थतच आहे. संगमनेरात मात्र या कंपनीला कोणाचीही भीती नसल्यासारखी स्थिती असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी सजलेला असूनही झोळे येथील टोलनाक्यावरुन सक्तीने टोलवसुली सुरु आहे. जुन्नरच्या आमदारांनी स्थानिकांच्या मागणीनुसार आणि नियमानुसार अपूर्ण कामे असल्याने तेथील टोल वसुली बंद केली, तसे धारिष्ट्य संगमनेरचे लोकप्रतिनिधी दाखवतील का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
संगमनेर टोल नाक्यावर लोकल वहानधारकांची लुट…
सध्या फास्टॅग च्या सक्तीमुळे सर्वच वहानधारकांनी गाडीला फास्टॅग लावले आहे, संगमनेर तालुक्यातील नागरिक टोल नाक्यावर आधार कार्ड दाखवुन आपल्या गाड्या टोलनाका पास करतात. परंतू फास्टॅग वरुन संबधित वहानचालकांचे पैसे त्वरित कमी न करता काही तासांनी किंवा एक किंवा दोन दिवसांनी कमी केले जातात. संगमनेर टोल नाक्यावर 85 रुपये फास्टॅग चार्जस आहेत व रिटर्न ला 45 रु चार्जेस आहेत.