घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाने केलेले काम ईश्वराचे ः थोरात ऑक्सिजन पुरवठ्यासह नवीन शंभर खाटांची व्यवस्था होणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संकटात ग्रामीण रुग्णालयातून सुमारे तीन हजार रुग्ण उपचार घेऊन बरे झालेली आहेत. या संकटात केलेले काम हे ईश्वराचे काम असून आगामी तिसर्‍या लाटेचा मोठा संभाव्य धोका लक्षात घेऊन घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यासह नवीन शंभर खाटांच्या व्यवस्थेसाठी कोविड केअर सेंटर विस्तारीकरणाचे काम होत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटरच्या पहिल्या मजल्यावर अद्ययावत ऑक्सिजन कोविड सेंटर विस्तारीकरण कामाचा शुभारंभ मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषद समिती सभापती मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे, उपसभापती नवनाथ अरगडे, विष्णूपंत रहाटळ, सरपंच सोपान राऊत, भाऊसाहेब पानसरे, मच्छिंद्र राऊत, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जर्‍हाड, डॉ. संदीप कचेरिया, डॉ. सुरेश घोलप, डॉ. प्रशांत थोरात, उपअभियंता सौरभ पाटील आदी उपस्थित होते.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय हे जिल्ह्यातील अद्ययावत रुग्णालय असून येथे कोरोना संकट काळात तीन हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. याचबरोबर या रुग्णालयात राज्यातील पहिले आर. टी. पी. सी. आर. मशीन असून पाच बायपॅप व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नव्याने शंभर खाटा वाढविण्यात येणार असून महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. आगामी लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अत्यंत काळजी घेणे गरजेची असून कोणीही निष्काळजीपणा करू नये. या लाटेत सुमारे पन्नास लाख रुग्ण होण्याचा मोठा धोका असल्याने आपल्याला सतर्कता व काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विविध खासगी रुग्णालयांना सुद्धा ऑक्सिजन निर्मितीसाठी सूचना करण्यात आली असून थोरात कारखान्यानेही ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात सुद्धा स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री थोरात म्हणाले. प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. जर्‍हाड यांनी केले.

Visits: 11 Today: 1 Total: 116985

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *