साईनाथनगर परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली एक लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील साईनाथनगर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी हत्यारे व 1 लाख रुपये मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. आरोपींमध्ये राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील चौघांचा तर नेवासा फाटा येथील एकाचा समावेश आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, प्रशांत राठोड, कॉन्स्टेबल मधुकर मिसाळ, आकाश काळे, अमृत आढाव व चालक हवालदार संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमून कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, 5 ते 6 इसम मोटारसायकलवर दरोडा घालण्याच्या तयारीत नेवासा ते श्रीरामपूर रस्त्याने नेवासा परिसरात येत आहेत. आत्ता गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक साईनाथनगर शिवारात सापळा लावून थांबलेले असताना बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन मोटारसायकलवर काही इसम जोरात येताना दिसले. पुढे असलेल्या मोटारसायकल चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा करताच त्याने मोटारसायकलचे दोन्ही ब्रेक जोरात दाबल्याने ते खाली पडले. पथकाने पडलेल्या इसमांना ताब्यात घेतले. त्याचवेळी मागील मोटारसायकलवर तिघे बसलेले दिसले. त्यांनी पथकास पाहून मोटारसायकल वळवून श्रीरामपूरच्या दिशेने पळून गेले. त्यांचा शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाहीत. यावेळी ताब्यात घेतलेल्या दोघांनी शुभम अनिल काळे (वय 23, रा. गणेशनगर ता. राहाता, हल्ली रा. खंडेवाडी, ता. बिडकीन, जि. औरंगाबाद) व दीपक अरुण चव्हाण (वय 24, रा. नेवासा फाटा) अशी नावे सांगितली. त्यांच्याकडे पळून गेलेल्यांची नावे विचारली असता अक्षय यशवंत आव्हाड, आनंद टकल्या अनिल काळे, शाहिद अकबर शेख (सर्व रा. गणेशनगर, ता. राहाता) असे सांगितले.

या कारवाईत ताब्यात घेतलेल्यांकडे मोटारसायकल, तीन मोबाईल फोन, एक लोखंडी सुरा, एक लाकडी दाडंके व मिरची पूड असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी वरील सर्व संशयित आरोपींविरुद्ध गुरनं. 543,/2023 भारतीय दंडविधान कलम 399, 402 सह आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.
